कोरोना महामारीमध्ये सतत कानावर पडणारा शब्द म्हणजे फुप्फुसांची HRCT. कोरोना रुग्णांच्या फुप्फुसांचा HRCT कधी केला जातो? हे तंत्र नेमकं काय आहे? गरोदर महिलांची ही चाचणी करतात का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. ईस्ट लंडनमधील क्वीन्स हॉस्पिटलमधील रॅडिओलॉजिस्ट डॉ. प्रवीण घाडगे यांनी दैनिक ‘पुढारी’ला दिलेल्या मुलाखतीत HRCT संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मुलाखतीचा हा संपादित भाग.
HRCT म्हणजे काय?
HRCT म्हणजे हाय रिझोल्युशन कॉम्प्युटेड टोमोग्राफी. यामध्ये अतिशय कमी जाडीचे सेक्शन घेतले जातात. नव्या तंत्रज्ञानामुळे कमीत कमी जाडीचे सेक्शन घेतले जातात. त्यामुळे अगदी चांगल्या प्रकारे निदान करता येते.
HRCT का केली जाते?
HRCT ही कोरनाची प्राथमिक चाचणी नाही. RT-PCR हीच प्राथमिक चाचणी आहे. CT स्कॅन केल्याने १०० टक्के निदान होत नाही. तसेच १०० टक्के गांभीर्यही वर्तवता येत नाही. पण CT स्कॅनमुळे फुप्फुसांच्या किती भागात इन्फेक्शन झाले आहे ते समजते. रुग्णाला दिसणारी लक्षणे आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन महत्त्वाचं आहे. कोरोनाची खात्री करण्यासाठी RT-PCR हीच गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे.
HRCT केव्हा करतात?
सौम्य आणि अजिबात लक्षणं नसतील, तर HRCT केली जात नाही.
ऑक्सिजन देऊनही सॅच्युरेशन वाढत नसेल तर रुग्णात गुंतागुंत झालेली आहे का हे समजून घेण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन अन्य काही आजार झालेत का हे तपासण्यासाठी HRCT केली जाते. HRCT रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी केली जाते. पुरक म्हणूनच या टेस्टचा वापर होतो. रुग्णाची लक्षणं आणि उपचाराला देत असलेला प्रतिसाद, हा भाग नेहमी महत्त्वाचा असतो. यात काही रक्तचाचण्याही केल्या जातात.
HRCT स्कोअर म्हणजे काय?
HRCT स्कोअर हा ४० किंवा २५च्या स्केलवर मोजतात. सर्वसाधारण २५च्या स्केलवर स्कोअर मोजला जातो. फुप्फुसांचे ५ भाग पडतात. प्रत्येक भागाला १ ते ५ असे गुण दिले जातात. नंतर पाच भागांचे गुण मोजले जातात.
CT स्कॅनमधून कोरोना झाला आहे का हे १०० टक्के समजत नाही. त्यासाठी कोरॅड क्लासिफिकेशन महत्त्वाचे असते. ६ स्केलवर हे मोजले जाते. ६ स्केल म्हणजे १०० टक्के कोरोना. ५ नंबर म्हणजे कोरोनाची शक्यता होय. १, २, ३, ४ पर्यंतचे कोरॅड स्केल कोरोना म्हणून कोणी लेबल करू शकत नाही.
बरा झालेला न्युमोनियाही CT स्कॅनवर पुढे १५ दिवस दिसू शकतो.
गरोदर महिलांना HRCT करावी का?
चाचणीची उपयुक्तता आणि धोका यांचं संतुलन साधून डॉक्टर निर्यण घेतात. HRCT गरोदर महिलांत टाळली जाते. पण महिलेला पल्मोनरी इंबोलिझम असेल आईचा जीव धोक्यात असेल तर डॉक्टर अशा चाचण्यांचा निर्णय घेतात. अशा वेळीही बाळापर्यत रॅडिएशन पोहचू नयेत यासाठी काळजी घेतली जाते.
HRCT हा गुंतागुतीचा विषय नाही. पण लोक फार घाबरले आहेत. कोरोनाची चाचणी पॉजिटिव्ह आली म्हणून घाबरू नका. लक्षणं दिसू लागल्यापासूनच आयसोलेट व्हावा. डॉक्टरांनी दिलेली औषध घ्या. स्टेरॉईडसारख्या औषधांचा वापर अॅडमिट असलेल्या रुग्णांसाठी डॉक्टर ठरवतात. सुरुवातीला स्टेरॉईड देणे योग्य नसते. तुम्ही तुमचे सॅच्युरेशन मोजत राहा. पल्स ऑक्सिमिटर आपल्याकडे असणे आवश्यक आहे. थर्मामीटरही असला पाहिजे. ऑक्सिजन हाच मुख्य उपाय सध्या आहे.
लक्षणांकडे लक्ष देणं, ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजत राहाणे आणि डॉक्टरांच्या संपर्कात असणे हे सर्वांत आवश्यक आहे. ८० टक्के रुग्ण यातूनच बरे होतात.