अकोला : भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण करून जिल्हाधिकारी होणाचे स्वप्न पाहणारा प्रांजल कोरोनाची लढाई हरला. पातूर तालुक्यातील तांदळी येथील प्रांजल प्रभाकर नाकटचा उपचारादरम्यान शुक्रवारी (दि.१४) रात्री मृत्यू झाला. कोरोनामुळे प्रांजलचे फुफ्फुस बाधित झाले होते. त्याला वाचवण्यासाठी मित्रपरिवारासह नातवाईकांनी ५५ लाख रुपये उभे केले होते. मात्र त्याचा अखेर काहीही उपयोग झाला नाही.
कोरोनाची बाधा झालेल्या प्रांजलने अकोला येथे काही दिवस उपचार घेतले. पण, त्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याला १० मे रोजी एअर अॅम्बुलंसने हैद्राबादला तातडीने हलवले. यासाठी समाजसेवक कृष्णा अंधारे यांनी अकोल्याचे डॉ. सतीश गुप्ता यांच्या माध्यमातून हैद्राबाद येथील रुग्णालयाशी संपर्क साधला होता. तलाठी प्रभाकर नाकट, अनुराधा नाकट यांचा कुशाग्र बुद्धिमत्तेचा प्रांजल आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावारण होते.
अधिक वाचा : हिंगणी बू येथील कोरोना लसीकरणला उत्कृष्ट प्रतिसाद
परंतु नियतीला ते मंजूर नव्हते. हैद्राबादला डॉ. जिंदाल यांच्या मार्गदर्शनात प्रांजलवर उपचार सुरू होते. प्रांजलच्या प्रकृतीत सुधारणा होत होती परंतु शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती खालावली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. अतिशय खडतर परिस्थितीत प्रांजलने यावर्षीच आयएएसची परिक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र नियतीने डाव साधल्याने त्याचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी प्रांजलच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून श्रद्धांजली वाहिली आहे.