नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) कमिशनने कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आज (दि. १३ ) केंद्रीय लोकसेवा आयोगाने या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी २७ जून रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. आता ही परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी होण्याची शक्यता आहे.
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संसर्ग वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्या पार्श्वभुमीवर राज्यातील तसेच देशातील अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. काही आठवड्यापूर्वीच नीट आणि पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने युपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
युपीएससीची पूर्व परीक्षा २७ जून रोजी होणार होती. पण, देशभरात गेल्या काही आठवडे दर दिवशी ३ लाखाच्या वर नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक दिवशीच्या मृत्यूचा आकडाही ४ हजाराच्या खाली येत नाही आहे. त्यामुळे अनेक राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहेत. तर अनेक राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत.