अकोला – ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधीनी आपल्या भागातील नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन करावे यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज केले.
मनपा, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यासोबत ऑनलाईन पद्धतीने आज जिल्हाधिकारी पापळकर यांनी संवाद साधून आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, ऑनलाईनव्दारे मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, गटविकास अधिकारी आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आवाहन केले की, लोकप्रतिनिधीनी आपल्या मतदार संघातील नागरिकांना भेट देवून कोविड-19 प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करण्याबाबात जनजागृती करुन जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी प्रोत्साहित करावे. कोरोनाचे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीने घरीच उपचार न घेता तातडीने चाचणी करुन रुग्णालयात उपचार घ्यावे. तसेच लग्नप्रसंगाकरीता 25 व्यक्तीनाच परवानगी देण्यात आली असून या नियमाचा पालन होत नसल्यास अशावर दंडात्मक कार्यवाही करण्याकरीता यंत्रणेला निर्देश द्यावे. लसीचा पुरवठा कमी होत असल्याने तालुका व ग्रामस्तरावर लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. नागरिकांची गर्दी कमी करण्याकरीता प्रयत्न करावे. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचेही आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.
तलाठी, ग्रामसेवक, आशावर्कस व कोतवाल या सर्व यंत्रणेनी ग्रामीण भागात नियमित चाचण्या, संपर्क चाचण्या वाढवून बाधीत रुग्णांचा शोध घेऊन त्याच्यावर तात्काळ उपचार करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.