कामधंदा मिळत नसल्याच्या नैराश्यातून एका व्यक्तीने पत्नी व एक वर्षाच्या मुलाचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्ञा हनुमंत शिंदे (वय २८) आणि मुलगा शिवजेत (वय एक वर्षे दोन महिने) या दोघांचा खून केल्यानंतर हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय ३८, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) याने आत्महत्या केली. याबाबत दर्याप्पा अर्जुंन शिंदे (रा. बक्षिहिपरगा, ता. दक्षिण सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत हा पत्नी व मुलासह कदमवाक वस्ती येथे राहत होता. मोलमजुरीची कामे करून उपजिवीका भागवत होता. पण, गेल्या काही दिवसांपासून करोनामुळे निर्बंध लागू आहेत. या काळात त्याला काम मिळाले नाही. या बेरोजगारीला कंटाळून त्याने रविवारी सकाळी पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःच्या एका वर्षाच्या मुलाचा चाकूने गळा कापून खून केला. त्यानंतर स्वतः बेडरूमधील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकणी सहायक आयुक्त कल्याण विधाते, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पाहणी केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.