कोरोना महामारी येण्यापूर्वी 5 वर्षेआधी 2015 मध्येच कोरोना विषाणूची नवे जैविक अस्त्र म्हणून चिनी शास्त्रज्ञांमध्ये चर्चा झाली होती. नव्याने उदयाला येणार्या विषाणूंच्या यादीत कोरोना विषाणू बेमालूमपणे मिसळण्याबद्दल, चीनच्या हितशत्रूंविरुद्ध त्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याबद्दलही खल झाला होता. ‘वीकेंड ऑस्ट्रेलियन’मध्ये ‘सार्सचा अनैसर्गिक स्रोत आणि तिसरे महायुद्ध लढणार्या जनुकीय जैविक अस्त्रांच्या मानवनिर्मित प्रजाती’ शीर्षकांतर्गत प्रसिद्ध झालेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी चिनी शास्त्रज्ञ तसेच चीनच्या आरोग्य विभागातील उच्च पदस्थ अधिकार्यांनी लिहिलेले संबंधित दस्तावेजच ‘ऑस्ट्रेलियन वीकेंड’ने समोर ठेवलेले आहेत. या दस्तावेजातून, चिनी लष्करी शास्त्रज्ञ सार्स कोरोना विषाणूचा महामारीपूर्वी 5 वर्षांआधीच जैविक अस्त्र म्हणून वापर करण्याबद्दल खल करत होते, असे उघडकीला आले आहे.
जगात सर्वात आधी कोरोनाचे रुग्ण जेथे आढळले, त्या चीनमधील वुहान शहरातील चीनच्या सरकारी मालकीच्या ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ने जंगली कोरोना व्हायरस केवळ गोळा करून साठवून ठेवू नये, तर त्याचे नवे व्हेरियंट्स, नवे स्ट्रेन्स तयार करावेत, असे चिनी लष्करी शास्त्रज्ञांनी सुचविले होते. प्रयोगशाळेत या सूचनेबरहुकूम वटवाघळातील विषाणूवर विविध प्रयोग झाले.
…तर चीनने कुणाला रोखले नसते
कोरोनाचा उद्भव शोधण्यासाठी जगातील शास्त्रज्ञांना चीन आपल्या भूमीत का दाखल होऊ देत नाही? वुहानच्या मटण मार्केटमधून कोरोना उद्भवला असता, तर चीनने कुणालाही रोखले नसते; पण तो वुहानच्या विषाणू विज्ञान प्रयोगशाळेतून उद्भवलेला आहे आणि म्हणूनच चीन उद्भव शोधायला उत्सुक शास्त्रज्ञांना येऊ देत नाही, असा मतप्रवाहही व्यक्त झाला आहे.