शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात उच्चशिक्षण घेतल्यानंतर त्यांना परदेशात अनेक संधी होत्या. मात्र, आपल्या ज्ञानाचा फायदा देशालाच झाला पाहिजे या भावनेपोटी त्यांनी येथेच संशोधन करण्याचा निर्णय घेतला. ऑक्सिजन, हायड्रोजन वायूंपासून इंधनपुरक ऊर्जा निर्माण करून त्यावर रेल्वेही धावू शकेल, असे संशोधन त्यांनी सुरू केले. यापाठोपाठ सात पेटंटही मिळविली. पण ऑक्सिजनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या या महान संशोधकाला अखेरच्या क्षणी ऑक्सिजन मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या ४४ वर्षीय डॉ. भालचंद्र काकडे यांची ही करुण कहानी.
डॉ. काकडे हे चेन्नई येथे एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तब्येत बिघडत गेली आणि त्यांना ऑक्सिजनची गरज लागली. मात्र, अखेरपर्यंत त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही. त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रचंड धडपड केली, पण सर्व व्यर्थ झाले. कमी वयात अत्युच्च कामगिरी करणारा संशोधक गमावल्याने कोल्हापूरसह राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. काकडे आणि त्यांच्या पत्नी चेन्नईतील एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करत होते. तेथील लॅबमध्ये काहीजणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काकड यांनीही आपली कोरोना टेस्ट केली. ती पॉझिटीव्ह आल्यानंतर उपचार सुरू झाले. काही दिवसांनी त्यांना श्वसनाला त्रास होऊ लागला. त्यांच्या विद्यार्थ्यानी शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल केले. मात्र, तेथे त्यांना नीट उपचार मिळाले नाहीत. ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या संशोधकांलाच ऑक्सिजनअभावी तडफडावे लागले. ऑक्सिजनची पातळी खालावत गेली आणि त्यांना जीवाला मुकावे लागले.
डॉ. काकडे यांनी शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी घेतली. त्यांना फेलोशीप मिळाल्यामुळे पुण्यातील रासायनिक प्रयोगशाळा, जपानमधील टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इंधननिर्मितीबाबत संशोधन केले. त्यातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेने रेल्वे धावू शकेल, याबाबत त्यांचे संशोधन सुरू होते. गेली २० वर्षे त्यांचे हे संशोधन सुरू होते.
डॉ. काकडे यांनी जपान, अमेरिकेसह भारतातील मिळविलेली पेटंट
मेटल नॅनो पार्टिकल अँड फॅब्रिकेशन (जपान २००९)
आयनोरिक प्रोटॉन कंडक्टर झेडआरएस केटिंग ऑन कार्बन नॅनोट्यूबस् (२०१२ जपान)
थ्रीडी नेटवर्क ऑफ ग्राफीन ऑक्साईड अँड कार्बन नॅनोरीबॉन फॉर सुपर कपॅसिटर (जपान २०१२)
कपोझिशन विथ एनहान्स्ड प्रोटॉन कंडक्टिव्हिटी (युरोप २०१०)
इलेक्ट्रो मटेरियल्स फॉर फ्युएल सेल (जपान २०१३)
कंपोझिशन विथ एनहान्सड प्रोटेान कंडक्टिव्हिटी (अमेरिका २०१३)
केमिकली ऑडर्ड इलेक्टोकॅटॅलिसीस फॉर फ्युएल सिली (भारत २०२०)