गुरुग्राम: दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणातल्या गुरुग्राममध्ये घडली आहे. ही विद्यार्थी १५ वर्षांची होती. या प्रकरणी मुलीच्या काकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मुलीच्या कानशिलात लगावली. त्यामुळेच तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप काकांनी केला आहे. नखं वाढवल्यानं, मोठे कानातले घातल्यानं आणि मोबाईल सोबत बाळगल्यानं मुख्याध्यापक सर्व विद्यार्थ्यांसमोर मुलीला ओरडले होते, असं काकांनी तक्रारीत म्हटलं आहे.
९ एप्रिल रोजी मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या एक दिवस आधी तिला शाळेत मुख्याध्यापक ओरडले होते. ‘८ एप्रिलला मुख्याध्यापकांनी मुलीच्या पालकांना शाळेत बोलावलं होतं. मुलगी शिस्त पाळत नसल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी पालकांकडे केली. विद्यार्थिनी नखं वाढवते, मोठे कानातले घालते, मोबाईल सोबत ठेवते अशा तक्रारींचा पाढा मुख्याध्यापकांनी पालकांसमोर वाचला. मी तुमच्या मुलीला शाळेतून काढून टाकेन, असंदेखील ते पुढे म्हणाले,’ असं मुलीच्या काकांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे.
८ एप्रिलला मुलगी शाळेतून घरी आली. ती घरी कोणाशीही बोलली नाही. तिनं काहीच खाल्लं नाही. ९ एप्रिलला विद्यार्थिनीचे पालक नववीत शिकत असलेल्या तिच्या भावाला घेऊन मुख्याध्यापकांना भेटायला गेले. मुलीला शाळेतून काढू नका, अशी विनंती त्यांनी केली. यानंतर मुख्याध्यापक संतापले. त्यांनी पालकांकडे दोन्ही मुलांच्या तक्रारी केल्या आणि त्यांची नावं शाळेतून कमी करण्यास सांगितली. पालकांनी मुख्याध्यापकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कोणाचंही ऐकून घेतलं नाही, असं मुलीच्या काकांनी तक्रारीत म्हटलं आहे.