अकोला: जिल्ह्यात पाणंद रस्ते विकासासाठी विशेष मोहिम राबवावयाची आहे. सन २०२१-२२ मध्ये पाणंद रस्त्यांच्या विकासाचे नियोजन करुन ते दि.२५ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना दिले.
जिल्ह्यातील पाणंद रस्ते विकासासाठी करावयाच्या नियोजनाबाबत आज ऑनलाईन पद्धतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण तसेच ऑनलाईन पद्धतीने क्षेत्रियस्तरावरील अधिकारी सहभागी झाले होते.
पाणंद रस्त्यांचे नियोजन करतांना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. तसेच ग्रामपंचायत स्तरावरील समितीचे ठराव घ्यावे व पंचायत समितीस्तरावर नियोजन करावे. रस्त्याची निवड करतांना जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांची मदत घ्यावी. लोकसहभागातून रस्ते तयार करण्यास अधिक प्राधान्य असेल,असेही त्यांनी स्पष्ट केले.