नवी दिल्ली : देशात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येने २ लाखांचा आकडा पार केला आहे. देशातील आतापर्यंतचा हा सर्वांधिक आकडा आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ७३९ नवे रुग्ण आढळून आले. तर १ हजार ३८ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशातील मृतांचा आकडा १ लाख ७३ हजार १२३ वर पोहोचला आहे.
आतापर्यंत देशातील १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १ कोटी २४ लाख २९ हजार ५६४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १४ लाख ७१ हजार ८७७ एवढी आहे. आतापर्यंत ११ कोटी ४४ लाख ९३ हजार २३८ जणांना लसीकरण करण्यात आले आहे.
अधिक वाचा :अकोला जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू, ३६६ नव्याने पॉझिटिव्ह
गंभीर बाब म्हणजे गेल्या ११ दिवसांत देशातील नवीन रुग्णसंख्येने दहाव्यांदा एक लाखाचा आकडा पार केला आहे. याआधी १४ एप्रिल रोजी १ लाख ८४ हजार ३७२ रुग्ण, १३ एप्रिल रोजी १ लाख ६१ हजार ७३६, १२ एप्रिल रोजी १ लाख ६८ हजार ९१२ रुग्ण आढळून आले होते.
पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट जास्त घातक ठरत आहे. सलग तीन दिवस दीड लाखांपेक्षा अधिक रुग्ण वाढले. तर चौथ्या दिवशी रुग्णसंख्येने २ लाखांचा आकडा पार केला आहे.
अधिक वाचा : सावध राहा, काळजी घ्या! चिमुरड्यांसाठी कोरोना बनलाय राक्षस; १४ दिवसाच्या मुलाचा घेतला जीव
वेगाने कोरोना वाढत असलेल्या राज्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. दहा राज्यात कोरोना संकट जास्त गडद असले तरी इतर राज्यातही त्याची तीव्रता वाढू लागली आहे. मृतांचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या राज्यात महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू राज्यांमधील रुग्णवाढही चिंताजनक आहे.