नवी दिल्ली : कोरोनाचे संकट गडद होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन कोरोनावरील लस देण्याबाबत केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ शकते, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी बुधवारी दिली. असा निर्णय घेतला गेला तर ४५ वर्षाखालील लोकांचे लसीकरणही झपाट्याने करता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
स्फुटनिक व्ही लसीचा वापर करण्यास अलीकडेच सरकारने परवानगी दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर काही कंपन्यानी घरोघरी जाऊन लस देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे संपर्क साधला आहे. या प्रस्तावावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत सरकारने लसीकरणाच्या कामालादेखील मोठी गती आणली आहे. जास्तीत जास्त लोकांना लस द्यायची असेल तर ४५ वर्षाखालील लोकांना लस देणे गरजेचे आहे, त्यामुळे याबाबतीतही सरकार काम करीत असल्याचे समजते.
अधिक वाचा : कोरोनाचे संकट : केवळ महाराष्ट्रात नव्हे देशातच लसीचा तुटवडा
खाजगी क्षेत्रातील अनेक कंपन्यानी घरोघरी जाऊन लसीकरण करू, असा प्रस्ताव केंद्र सरकारला दिलेला आहे. लसीकरणासाठी प्रती व्यक्ती २५ ते ३७ रुपये आकारण्याची मुभा द्यावी, असे या प्रस्तावांमध्ये म्हटलेले आहे. घरोघरी जाऊन लस देण्याबाबत निर्णय घेण्यात आला तरी सुरवातीच्या या कंपन्याना सरकारी नेटवर्कचा वापर करावा लागणार आहे.