मुंबई : चीनच्या वुहान प्रांतातून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात पाय पसरले आहेत. भारतातही या विषाणूने शिरकाव केला असून आतापर्यंत अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून देशात रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. या विषाणूला रोखण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक स्वत:ची काळजी घेत आहे. तर पालिका रुग्णालयांमध्येही मोठ्या संख्येने लसीकरण मोहीम राबवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच या विषाणूची तीन नवी लक्षणं समोर आली होती. त्यातच आता पुन्हा एकदा पाच नवीन लक्षणं (COVID Tongue) आढळून येत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
जानेवारी २०२१ मध्ये कोरोनाचं ‘COVID Tongue’ हे नवीन लक्षणं समोर आलं आहे. लंडनच्या किंग्स कॉलेजचे प्रोफेसर टीम स्पेक्टर यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत कोरोनाच्या गंभीर लक्षणांपैकी ‘COVID Tongue’ हे एक महत्त्वाचं लक्षणं असल्याचं म्हटलं आहे. या लक्षणामध्ये तोंड आणि ओठ यांच्याभोवती काही समस्या निर्माण होतात. त्यामुळे ‘COVID Tongue’ ची नेमकी लक्षणं कोणती ते जाणून घेऊयात.
१. COVID Tongue -:
‘COVID Tongue’ या लक्षणामध्ये जीभेवर गंभीर परिणाम होतो. यात जीभेची जळजळ होते आणि त्यावर सूज येते.
२. जीभेचा रंग बदलणे -:
कोरोना रुग्णांमध्ये जीभेचा रंग बदलणे हे एक महत्त्वाचं लक्षण दिसून येतं. यात जीभेचा रंग बदलण्यासोबतच ओठ आणि जीभ यांना ठणका लागतो.
३. जीभेवर पांढरे डाग येणे -:
अनेक कोरोना रुग्णांच्या जीभेवर लहान लहान पांढरे ठिपके किंवा पॅच दिसू लागतात.
४. कोरडे ओठ -:
कोरोनाची बाधा झाल्यावर ओठ झपाट्याने कोरडे पडतात. यात ओठांवरील त्वचा निघते. तसंच ओठांच्या आतमध्येही हा त्रास जाणवतो.
५. तोंडात फोड येणे -:
जर सतत जीभेवर किंवा तोंडात उष्णतेचे फोड येत असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण, अनेक कोरोनाग्रस्तांमध्ये तोंडात किंवा जीभेवर फोड येण्याची समस्या आढळून आली आहे.