कोल्हापूर : सात दिवसांच्या आत महाराष्ट्रातील नागरिकांना लस उपलब्ध झाली नाही तर सीरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
लस घ्यायला या देशातील नागरिक तयार आहेत. महाराष्ट्रातील लोक लसीसाठी आक्रोश करत आहेत. पण त्यांना लस मिळत नाही ही वस्तूस्थिती आहे. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत. इकडे पंतप्रधानांचे लक्ष आहे का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.
सात दिवसाच्या आत महाराष्ट्रातील नागरिकांना लस उपलब्ध झाली नाही तर सिरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही. @CMOMaharashtra @PMOIndia @narendramodi @rajeshtope11 @ANI @AmitShah pic.twitter.com/GPiiYPnOT0
— Raju Shetti (@rajushetti) April 9, 2021
देशात कोरोना रुग्ण सापडत आहे. त्यातील निम्यापेक्षा जास्त रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात लसीचा पुरवठा जास्त करायला हवा. एवढी साधी यांच्या लक्षात येत नसेल तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून मी आजच पंतप्रधान, गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी पत्र लिहिले आहे. जर महाराष्ट्राचा लस पुरवठा वाढवला नाही तर आम्ही येत्या आठवड्यानंतर सीरममधून राज्याबाहेर जाणाऱ्या लसीच्या गाड्या अडवल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
जर आमची माणसं तडफडत असतील. त्यांना व्हेंटिलेटर, बेड मिळत नसतील. आज महाराष्ट्राला लसीची सर्वाधिक गरज असताना महाराष्ट्राच्या बाबतीत सापत्न वागणूक का? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.