नांदेड: (अमोल चंद्रशेखर भारती ) मी गेल्या आठ दिवसांपासून स्वच्छ अंघोळ करू शकलो नाही. आता तुम्ही म्हणाल मला वेळच मिळाला नाही का? अंघोळ करायला! तसे, तर अजिबात नाही; कारण मागच्या एक वर्षापासून वेळच वेळ आहे. वेळ इतका आहे की, एकदा काय दिवसातून तीनदा अंघोळ करू शकतो. आता हा वेळ मिळण्याचे कारण हे की, कोविड-19 मुळे सततचे लॉक डाऊन आणि नुसता फावला वेळ, मग तुम्ही अंघोळ करा की ब्रश करा, सगळा दिवस तुमचाच आहे. हं! तर मी काय म्हणत होतो? ‘मी व्यवस्थित अंघोळ करू शकलो नाही!’ का? तर पुन्हा हेच कारण ‘लॉक डाऊन!’ होय! ‘लॉक डाऊनच!’ झालं असं की, मला अंघोळ करायची म्हटलं की ‘डव साबण’ लागतो. अर्थात मी त्या साबणची जाहिरात करत नाही. आणि तुम्हाला ती आवडली तरी काही उपयोग नाही. कारण तो साबण प्रत्येकाच्याच शरीराला लागू पडत नाही. शरीर वेगळे तर साबनही वेगळाच.असो! माझे ‘साबण पुराण’ सम्पवतो. हा साबण घ्यायचा म्हटलं की, दुकानात जावे लागेल न! मग दुकानच बंद पडल्यावर कुठे जाऊन आणू! मग काय चालू आहे, नुसत्या पाण्याने व कधी-कधी न आवडत्या इतर साबणाने अंघोळ करणे.
आजचा लेख थोडा दीर्घ राहील, पण मुद्देसुद मांडण्याचा माझा प्रयत्न राहील. म्हणून एकदा वाचाच, तुमची इच्छा असो वा नसो! असेही रिकामेच असाल तर पोगोवर छोटा भीम बघण्यापेक्षा किंवा सेट मॅक्स वर तोच तो ‘सूर्यवंशम’ बघण्यापेक्षा बरे आहे की, असा एखादा लेख वाचणे! वाचून विचार करायचा की न करायचा हे तुमचं तुम्ही ठरवा! तेवढं सांगत बसायला मलाही तितका वेळ नाही.
मला केवळ साबण नाही मिळाला, तर मी किती भयंकर व्यथित झालो हे सांगत आहे. आता यातला ‘भयंकर’ शब्दोच्चार जरी अतिशयोक्त वाटत असला तरी बाहेरची स्थिती सध्यातरी तशीच आहे. साबण व तेल विकून दुकानदारी करणारे देशोधडीला लागले आहेत. आता तोच साबण त्यांच्या मयतावर घासण्याची व कोणाला तरी तेल लावून चोपण्याची वेळ आमची काळजी करणाऱ्या, रक्षणकर्ते असणाऱ्या व तसा दिखावा करणाऱ्या शासन- प्रशासन व्यवस्थेने येऊ देऊ नाही; हे कोपरापासून हात जोडून विनंती. कारण त्याशिवाय सध्यातरी पर्याय नाही. कारण बाहेर निघालो तर दांडूके खाण्याची व रोज- रोज आपलीच इज्जत विकण्याची आम्हाला हौसही नाही, आणि माणूस म्हणून तितके अजून बेशरम झालो नाही.
माझे एक पत्रकार मित्र दीपक सूर्यवंशी खूप दिवसांपासून या विषयावरती लेख लिहा असे सांगत होते. माझी लिहण्याची खूप तीव्र इच्छा होती, परंतु माझे स्वतःचेच कुटुंबीय या कोविडरुपी राक्षसाच्या विळख्यात अडकल्यामुळे मी लिहू शकलो नाही. त्यामुळे क्षमस्व! परंतु, काल सहज मी आमच्या स्थानिक मार्केटमध्ये फेरफटका मारला ( माझे मेडिकलचे खाजगी काम होते म्हणून, नाहीतर पुन्हा पकडून न्याल! फिरायला का म्हणून! ) तर मला स्थिती व परिस्थिती ही वेगळीच दिसली, जी काही आकड्यांत संख्या असलेल्या प्रशासन अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिसत असेल का नाही कोणास ठावूक!
शासन- प्रशासन काय म्हणते? कोविड वाढल्यामुळे ‘निर्बंधासह कडक लॉक डाऊन, काही अत्यंत आवश्यक असणाऱ्या ठिकाणी हे निर्बंध शिथिल राहतील.’ आशा प्रकारच्या काही घोषणा व पत्रके रोज सुटतात व व्हाट्सअप्पच्या महामंडळात फिरतात व आम्ही ते फिरवतो, गरागरा! मग हा कडक लॉक डाऊन व कडक निर्बंध कोणासाठी? आणि कोणी पाळायचे? हे शासनाने लिहून ठेवले नसले तरी ते दिसत नसेल इतकेही आम्ही आंधळे नाही आहोत.
लॉक डाऊन म्हटले की, दुकाने बंद म्हणे! कोणती? तर ज्यात माणसे काम करत नाहीत आणि ज्यांना धंदा झाला काय किंवा नाही, याने काहीही फरक पडत नाही. अशी दुकाने का? मला तर तशीच दुकाने वाटत आहेत. मग त्या आदेशीत पत्रकात काय लिहले हे वाचण्याची गरजच नाही. कारण, कोणी 100 वर्षाचं म्हातारं मेल्यावर दुकाने बंद ठेवणारे तुम्ही, तुमचे लाडके लेकरं- कुटुंबीय भुकेने तिळातीळाने मरत असताना कसे काय पाहू शकता हेच मला कळत नाही. म्हणजे तुम्हाला गरज नाही, दुकानदारी करायची! हाच अर्थ काढायचा का? निषेध म्हणून आपले प्रतिष्ठाने बंद ठेवणारे तुम्ही, आता निषेध करायला मुहूर्त काढणार आहात का? की तुम्ही उठून जागे व्हावे म्हणून मुहूर्त काढावा लागेल?
आता मी फिरलेल्या मार्केटची अवस्था सांगतो. धरणातले पाणी संपल्यावर कसे, काही ठिकाणी खड्ड्यात पाणी तर कुठे कोरडे दिसते, तशीच काही परिस्थिती होती. एक दुकान बंद तर एक सुरू असा तो प्रकार होता. एकंदरीत मार्केट बंद असले तरी, पहायला सुरूच दिसत होते. सुरू आहे, पोटपाणी चालत आहे, चांगली गोष्ट आहे. मग, बाकीचे दुकाने बंद करून ठेवलेले रिचार्ज करून भूक व त्यांच्या दैनिक गरजा भागवत असतील का? की त्यांना भूक लागतच नसेल? लहानपणी ठेच लागली की समोर दिसेल त्याला शिव्या घालायचो, तुम्हीपण करत असाल! तसेच काही झाले, कोविडचा प्रादुर्भाव वाढला की चला मार्केट बंद करू! असच काही चालू आहे. कोणाला तरी जबाबदार धरून आपण काहीतरी महान काम करत आहोत हे जनतेला दाखवावं लागेल न! मग काही जणांचा बळी गेला तर गेला. मुळात ज्यांचा बळी चालला न, ते आमचा जीव घ्या म्हणून रांगेत उभे आहेत, कारण संवेदनाहीन समाजातील असंवेदनशील वास्तव होऊन ते बसले आहेत. मनाने व तनाने इतके निगरगट्ट झाले आहेत की, परिस्थिती काय व आपण कसे वागत आहोत हे मेंदू असून कळत नाही, अणि मन असून समजत नाही.
जीवनावश्यक गरजा म्हणे! मला ते मूलभूत गरजा माहीती होतं! पण, त्याआधी जीवनावश्यक गरजा असतात. हे कोविडच्या काळात शिकायला मिळाले. जीवनावश्यक काय? तर- एक गोळी आणायला मेडिकलला दिवसातून तीनदा व चार प्रकारच्या मेडिकलवर जायचे. किराणा माल रोज भरायचा. कारण आज भरलेली साखर उद्या जुनी होते की काय हेच कळणं झालं. शेतीशी निगडित सर्व आस्थापने सुरू; आणि फार पूर्वीपासून ‘वस्त्र’ हे मूलभूत गरज आहे, आता त्यात संशोधन करून ते वगळण्याची वेळ आली आहे, डोक्यावर केस वाढून उवा होऊन तुम्ही पागल होऊन जीवनावश्यकच्या नावाखाली दवाखान्यात दाखल झाले तरी चालेल, पण केस कर्तनालाय उघडायचे नाही. घरी बसून दाढी करावं किंवा हाताची नखे काढावं म्हटलं तर तोंड भिंतीला घासून रक्तबंबाळ होईपर्यंत त्वचा घासून दाढी करा, नाहीतर हाताची नखे स्वतःच्या दातात व पायाची नखे दुसऱ्याच्या तोंडात धरून कापू, पण जनरल स्टोर आम्ही काय उघडणार नाही. कारण ते जीवनावश्यक नाही म्हणे! घर बांधायला थांबा थोडं, मग घर नसल्यामुळे पोराची सोयरीक मोडून तो एजबार झाला तरी चालेल.’निवारा’ जीवनावश्यक नाही, असच राहून-राहून ऐकू येऊ लागलं आहे.
आता ओंजळी पकडायची सवयच लागली असेल तर ओंजळीतच खा! कारण भांड्यात खायला भांड्याची दुकाने अजूनतरी चालू नाहीत. त्याला जीवनावश्यक म्हणून वगळले आहे न! आता उन्हाने तुमची काहिली होऊ द्या की अंगाची आग, आणि तुम्ही कितीही करून घ्या आग, दुकाने काही उघडणार नाहीत इलेक्ट्रॉनिक्सची! कारण ते पण जीवनावश्यक नाहीत. आजची स्तिथी तर अशी आहे की, कोणी मरताना शेवटची इच्छा म्हणून गुलाब जामुन मागितले तर हॉटेल बंद असल्यामुळे त्याला ते कदाचित मिळणार नाही. कारण त्याने शासनाचे पत्रक न पाहताच मागणी केली न! मग तो तसाच कोरडा मेला तरी चालेल, पण जीवनावश्यकशी तडजोड नाही म्हणजे नाही!
काय हो माणसाला खायला अन्न लागते. बरोबर? मग डाळ, तांदूळ, गहू हे अन्न आहे की नाही? मग हे महिनाभर भरून ठेवल्यावर रोज आणायला बाहेर जावे लागते का? मग कठीण प्रसंगी चार- दोन दिवस भाजीपाला नाही खाला तर आपण मरणार नाही. पण, जीवनावश्यकच्या नावाखाली रोज फिरता कसे येईल.
सोशल डिस्टनसिंग नवी गाडी घेतली की रोज स्वच्छ ठेवतो तसे काही दिवस सुरू होते. मग, जीवनावश्यकच्या दुकानासमोर रांग लावताना किंवा रस्त्याने फिरताना आता कोविड जुना झाला म्हणून ‘सोशल डिस्टनसिंग’ कदाचित दिसत नाही. कारण मला वाटते तिथल्या हवेत सॅनिटायजर फवारले असेल. बसमध्ये कोरोनापेक्षा त्या वासाने मरण्याची अवस्था आहे, आणि चालले बसला प्रवासाची परवानगी द्यायला. राग याचा आहे की, महालक्ष्मी उभारतो तसे हे चालू आहे. सगळा निव्वळ दिखावा, आणि फलनिष्पत्ती काय तर कोणी पहायला तयारच नाही. मग काही जणांचे नियमाखाली बळी गेले तर गेले. तुमचे बळी हे असेच जाणार; कारण तुम्ही आता स्वस्थ व सुस्त झाले आहात. जोपर्यंत तुमचा मधला मेंदू- जो जिवंत आहे; याची साक्ष देणार नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील.
उपरोक्त शीर्षक देण्यामागचे कारण हे की, नवा कोविड स्ट्रेन आला म्हणे. नवा काय सांगता, तुमच्या वागण्यावरून तर असे वाटायले की जेवढे काही स्ट्रेन आले हे सगळे या बंद दुकानातूनच आले असावेत. पण, यांना हे कळत नाही की दुकानाची एवढीच ऍलर्जी असेल किंवा तिथंच कोरोना पसरत असेल तर एवढे पैसे खर्च करताय मग दिवसातून दुकानाला दोनदा सॅनिटायज करून देत जा म्हणा. माणसं जगतील तर! तुम्ही त्यांना माणसे म्हणून पाहत असाल तर!
ज्यांना शासन वाचवायचे म्हणते ती माणसेच आणि ज्यांची दुकाने वारंवार बंद केली जातात त्यांची लेकरे भुकेने मरणारी तीही माणसेच! मग तुम्हाला माणसे वाचवायची की माणुसकी तुम्हीच ठरवा!
लेखक- अमोल चंद्रशेखर भारती