मुंबई : राज्यात दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन उद्यापासून सुरू होत असला तरी पुढील तीन आठवडे लॉकडाऊन केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्याने धास्ती वाढली आहे. आज रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदीला सुरुवात होणार आहे.वडेट्टीवार एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले, ‘कोरोनाला अटकाव घालण्यासाठी राज्यात आगामी काळात पूर्ण लॉकडाऊन करावा लागणार आहे. गर्दी टाळण्यासाठी रेल्वेवरही निर्बंध आणावे लागतील. कोरोनाची संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही कितीही उपाययोजना केल्या, तरी मनुष्यबळ कमी पडत आहे. आरोग्य व्यवस्थेतील डॉक्टर, नर्स कमी पडतील. ही यंत्रणा कुठून आणायची. आता साडेपाच हजार डॉक्टर अंतिम परीक्षा पास होतील, त्यांना आम्ही कामावर घेणार आहोत. तरीही यंत्रणा कमी पडत आहेत. त्यामुळे, विकेंडऐवजी कडक लॉकडाऊनची विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.’
राज्यात किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय आपण निरपराध लोकांचे प्राण वाचवू शकत नाही. कारण, राज्यात कोविडचा स्प्रेड झालेला आहे. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असेही ते म्हणाले. मुंबईतील लोकलसेवाही बंद केली जाण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.