हिवरखेड(धिरज बजाज )- दि ७ एप्रिल रोजी रात्री हिवरखेड ग्रामपंचायत द्वारे जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार ३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही दुकाने उघडी दिसल्यास प्रत्येकी १०००० रु.दंड करण्यात येईल अश्या प्रकारची दवंडी हिवरखेड गावात फिरविली होती. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होऊन एक प्रकारची दहशतच पसरली होती. त्यामुळे तब्बल प्रत्येकी १०,००० रुपये दंड म्हणजे एव्हडी मोठी रक्कम दंड असते की खंडणी ? असा साहजिक प्रश्न व्यापाऱ्यांना पडला.
कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शासन मागच्या वर्षी पासून वेगवेगळ्या उपाय योजना करत आहे. मागच्या वर्षी सुद्धा ७८ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला होता. एवढया सगळ्या उपाययोजना करूनही कोरोना आटोक्यात येत नसल्याने शासनाने दि.८ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत दुकाने बंद करण्याचा आदेश काढला. त्यामुळे या अन्यायपूर्वक फतव्या विरोधात हिवरखेड येथील व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटला. आधीच दुकानाचे भाडे, अवाढव्य विजबिले, एल.आय.सी.हफ्ते, कर्जाचे हफ्ते व मजुरांची मजुरी देतांना व्यापाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत. यासगळ्या गोष्टींना चिडून हिवरखेड चे सर्व लहान सहान व्यापारी व मोठे व्यावसायिक वर्ग रस्त्यावर उतरला असून सर्व व्यावसायिकांनी शांततेत मोर्चा काढत ग्राम पंचायत सरपंच आणि ठाणेदारांना निवेदन दिले. आणि आपल्या व्यथा मांडल्या. यापुढे सर्व व्यावसायिक आपली दुकाने उघडी ठेवणार असून ग्रामपंचायत, प्रशासन, आणि पोलीस, इत्यादींनी व्यापाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न लक्षात घेता कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये अशी विनवणी केली. निवडणुका, प्रचार, मतदानाच्या रांगा, इत्यादींमुळे कोरोना पसरत नसून फक्त दुकाने उघडल्यावरच कोरोना पसरतो काय, असा प्रश्न व्यवसायिकांनी केला. या प्रसंगी ग्रा.प. गटनेत्यांनी गावात दोन नंबर, वरलीचे आणि इतर अवैध धंदे सर्रास जोमाने सुरू असतांना सर्वसामान्य व्यापाऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही. अशी व्यापाऱ्यांच्या बाजूने प्रतिक्रिया देऊन व्यापाऱ्यांना पाठिंबा दिला. सोबतच व्यापाऱ्यांनी ठाणेदारांना सुद्धा आम्ही दुकाने सुरूच ठेवणार असल्याचे निवेदन दिले. आम्हाला पाठीवर मारा पोटा वर मारू नका, गरज पडल्यास आम्ही मुलाबाळांसह पुन्हा रस्त्यावर उतरू अशा संतप्त प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी गावातील लहान-मोठे शेकडो व्यापारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांकडुन व्यापाऱ्यांना अपेक्षा
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनतेने हिवरखेड येथील ग्रामपंचायत वर प्रहारचा झेंडा फडकविला होता. त्यामुळे त्यांचेकडून जनतेला भरपूर अपेक्षा आहेत. परंतु दुकाने उघडल्यास 10000 दंड वसुली करण्याची दवंडी फिरल्याने व्यापाऱ्यांनी थेट ग्रामपंचायतवर मोर्चा काढला त्यावर शासनाच्या निर्देशावरून दवंडी देने भाग पडले असून ग्रामपंचायत कोणावरही दंडात्मक कार्यवाही करणार नसल्याचे आश्वासन ग्रामपंचायती कडून देण्यात आले.
काही दिवसांपूर्वी शनिवार रविवार चा लॉकडाउन पालकमंत्र्यांच्या निर्णायक भूमिकेमुळे मागे घेण्यात आला होता. त्याच प्रकारे पालकमंत्र्यांनी आता पुन्हा निर्णायक भूमिका घेऊन तीस तारखेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा आणि 10 हजार रुपये दंड वसुलीचा अन्याय पूर्वक फतवा मागे घेण्यास भाग पाडावे. अशी माफक अपेक्षा नागरिकांना पालकमंत्री बच्चू भाऊ कडून आहे.