उत्तराखंडच्या चमोलीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वडिलांनी कोरोना संकट काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पैशाची अडचण दूर करण्यासाठी आपल्या 14 वर्षीय मुलीचे फक्त 6000 रुपयांत 32 वर्षीय व्यक्तीशी लग्न लावून दिले. ज्या व्यक्तीने मुलगी विकत घेतली, तो दररोज मद्यपान करून मुलीला मारहाण आणि तिच्यावर बलात्कार करत होता. या मुलीला वेदना होत होत्या पण तिच्या वेदना ऐकण्यासाठी कोणीही नव्हते.
असा झाला खुलासा
लाकडाऊननंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये शाळा सुरू झाल्या. उत्तराखंडच्या चामोली येथील एका शाळेत विद्यार्थिनी पोहोचली नाही, तेव्हा शिक्षकांनी तिला त्याबद्दल विचारले. तेव्हा विद्यार्थिनीबाबत काहीच माहिती मिळाली नाही. परीक्षा होणार होती म्हणून शिक्षक मुलीच्या घरी पोहोचले. त्यांनी विद्यार्थिनीला शाळेत पाठविण्यास सांगितले, पण त्यानंतरही ही विद्यार्थिनी आली नाही.
शिक्षकांना संशय आल्यानंतर सत्य समजले
मुलीच्या घरी पोहोचल्यानंतर शिक्षकांना संशय आला. जेव्हा मुलीच्या वडिलांकडून चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने आपल्या 14 वर्षाच्या मुलीचे लग्न केल्याचे समजले. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने आपल्या 14 वर्षांच्या मुलीचे लग्न फक्त 32 वर्षांच्या व्यक्तीशी केले.
मध्यस्थीनी मुलीचा केला होता सौदा
शिक्षक म्हणाले की, गावातल्या एका मध्यस्थीने मुलीच्या पालकांची फसवणूक करून त्यांची मुलगी सहा हजार रुपयांत विकली होती. मुलीच्या वडिलांनी कबूल केले की लॉकडाऊनमध्ये आपल्याला पैशांची गरज आहे, म्हणून त्यांनी आपल्या मुलीला विकले.
‘दररोज दारू पिऊन मारहाण आणि बलात्कार’
“मुलीने सांगितले की, तिचा कथित पती दररोज मद्यपान करायचा आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करायचा. होळीच्या दिवशी तिच्या पतीने जबर मारहाण केली. त्याने त्याच्यावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. आता मुलगी परत तिच्या पतीकडे जाऊ इच्छित नाही”, असे शिक्षक उपेंद्र यांनी सांगितले.
या घटनेमुळे मुलीला मोठा धक्का बसला आहे
सोमवारी ही मुलगी गुलाबी रंगाची सलवार सूट, मंगळसूत्र आणि डोक्यावर जाड सिंदूर घालून शाळेत आली. तिला मोठा धक्का बसला आहे. तिने सांगितले की, लाकडाऊनमध्ये लग्न झाले होते. पती मारहाण करीत होता, तो कधीच चांगला वागला नाही ‘ तसेच, काही वर्षांपूर्वी तिच्या आईचा मृत्यू झाला होता. तिला तीन लहान भावंडे आहेत. तिच्या मोठ्या बहिणीचेही वयाच्या 18 व्या वर्षापूर्वीच लग्न झाले होते, असे या मुलीने सांगितले.
शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल
शिक्षिकेचा मुलीला रेस्क्यू करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिक्षिका मुलींच्या दुर्दशाचे वर्णन करीत आहे. इतकेच नाही तर डोंगराळ भागात लहान मुली पैशासाठी कसे लग्न करतात, हे त्या सांगत आहेत. बरेच लोक मुलींची खरेदी करतात. काही दिवस त्यांचे शारीरिक शोषण केले जाते आणि नंतर त्यांना विकले जाते.