अकोला – जिल्ह्यातील कोविड-१९ चा प्रार्दुभाव लक्षात घेवून व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरी व ग्रामीण क्षेत्राकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश निर्गमित केले आहे.
१ सर्व प्रकारच्या सेवा अंतर्गत असेलली प्रतिष्ठाने, दुकाने पुढील आदेशापर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत सुरु राहतील. मात्र सर्व संबंधित व्यावसायिक, दुकानदार तसेच कामगार यांनी त्यांची कोविड चाचणी करणे अनिवार्य राहील. ज्या प्रतिष्ठान, दुकान, व्यवसाय येथील सर्व संबंधीतांची कोविडची चाचणी निगेटीव्ह आली असेल अशाच प्रतिष्ठान, दुकान, व्यावसायिक यांना त्यांच्या आस्थापना सुरु ठेवता येईल. अन्यथा अशी प्रतिष्ठाने सिल करण्यात येतील. तसेच त्यांचेवर दंडनीय कारवाई सुद्धा करण्यात येईल.
२. खाद्यगृहे, रेस्टॉरेन्ट, यांचे किचन व स्वयंपाकगृह हे सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत सुरु राहतील. तथापि अशा खाद्यगृह, रेस्टॉरेंट यांना फक्त घरपोच सेवा देण्याकरिता परवानगी अनुज्ञेय राहील.
३. रात्रीची जमावबंदी व संचारबंदी बाबत दि.२७ मार्चचे आदेश कायम ठेवून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण अकोला जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये रात्रीचे आठ वाजेपासून सकाळी सहावाजेपर्यंत रात्रीची जमावबंदी व संचारबंदी ( Night Curfew) लागू करण्यात येत आहे. संचारबंदीच्या आदेशाच्या अनुषंगाने कोणत्याही व्यक्ती, नागरीकांना हालचाल करण्याकरिता, जमा व एकत्रित येण्याकरीता सक्त मनाई करण्यात आली आहे.
४. सर्व सार्वजनिक जागा, बाग बगीचे हे रात्री आठ ते सकाळी सहा या कालावधीत बंद राहतील.
५. लग्न समारंभाकरिता केवळ ५० व्यक्तिंना उपस्थितीची परवानगी राहील.( बॅन्ड पथक व सांस्कृतिक पथकासह) तहसिलदारांकडुन परवानगी अनुज्ञेय राहील.
६. अंतिम संस्काराकरिता केवळ २० व्यक्तींना उपस्थित राहता येईल.
७. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील भरणारे आठवडी बाजार हे दि. ५ एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत कोविडचे अनुषंगाने निर्गमित केलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांचा अवलंब करुन सुरु करण्यात येत आहेत.
अ) आठवडी बाजारामध्ये व्यवसाय करणारे व्यावसायिक, दुकानदार, कामगार यांनी आपली दुकाने बाजारामध्ये लावण्यापूर्वी कोविड चाचणी करणे बंधनकारक राहील. ज्या व्यावसायिक, दुकानदार, कामगार यांची कोविडची चाचणी निगेटीव्ह आली असेल अशाच व्यावसायिकांना त्यांची दुकाने आठवडी बाजारामध्ये लावता येईल. अन्यथा अशा दुकानदारावर व व्यावसायिकांवर दंडनिय कारवाई करण्यात येईल.
ब) कोविड चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत असल्याशिवाय बाजारामध्ये दुकान लावता येणार नाही.
क) बाजारामध्ये दुकानाची व व्यवसायाची बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distancing) च्या नियमानुसार असावी. तसेच मास्कचा वापर बंधनकारक राहील. या बाबत स्थानिक प्रशासनाने अशी व्यवस्था करावी.
ड) वापरण्यात येणाऱ्या जागेचे, साहित्याचे वेळोवेळी निर्जंतुकीरण करण्यात यावे.
इ) कोविड-19 चे अनुषंगाने केन्द्र शासन व राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.
ई) याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध आदेशांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
८. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आधार केन्द्र कोविड-१९ च्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या उपाययोजनेचा अवलंब करुन ५० टक्के कर्मचारी क्षमतेसह पुढील आदेशापर्यंत सुरु राहतील.
९. गृह अलगीकरण बाबतच्या सर्व नियम व अटींचे तंतोतंत पालन होण्याचे दृष्टीने महानगरपालिका, जिल्हा शल्य चिकित्सक, तसेच सर्व संबंधित आरोग्य यंत्रणा यांनी तपासणी करुन आवश्यक कारवाई करावी.
१०. सर्व अशासकीय कार्यालये (आरोग्य तसेच अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालये वगळून) ५० टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरु ठेवता येईल.
११. उत्पादन करणारे कारखाने व संस्था ह्या पूर्ण कर्मचारी क्षमतेसह ठेवता येतील. मात्र त्यांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने आवश्यक त्या उपायययोजना करणे अत्यावश्यक राहील.
१२. वरील आदेशाचे उलंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्था ह्या खालील प्रमाणे दंडनिय कारवाईस पात्र राहतील.
असे असेल कारवाईचे स्वरुप-
रात्रीचे संचारबंदीचे कालावधीमध्ये पांच पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास, रात्रीचे संचारबंदीचे कालावधीमध्ये सार्वजनिक ठिकाणी व बाग बगीच्यामध्ये वावरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर एक हजार रुपये दंडाची रक्कम आकारली जाईल.
दुकानदार,भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, जिवनावश्यक वस्तु विक्रेते, आस्थापना, मालक, दुकाननदार, चहाटपरी, पानटपरी, हॉकर्स, विक्रेता यांनी कोविड चे अनुषंगाने निर्गमित केलेल्या आदेशांचा भंग केल्यास संबंधित विक्रेतावर एक हजार रुपये दंड. चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या व्यक्तीवर पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल.
लग्न समारंभ किंवा इतर समारंभाकरिता ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास प्रति व्यक्ती पाचशे रुपये व संबंधित कार्यालय, सभागृह, लॉन, इतर संबंधित जागेचे मालक यांना २५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन १५ दिवसांकरिता सिल करण्यात येईल.
वरील नियमाचा भंग करणाऱ्यावर संबंधित क्षेत्रातील पोलीस विभाग, महानगर पालिका, नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल विभाग, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी दंडात्मक कारवाई करतील. तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही केली जाईल, असे आदेशात नमूद केले आहे.