डोंबिवलीत राहणाऱ्या आरती अरूण सकपाळ या 47 वर्षीय बारबालेची हत्या करणाऱ्या श्रीनिवास बसवा मडीवाल (वय 34, रा. रूचिरा बार, कल्याण रेल्वे स्टेशन रोड, मूळगाव – रा. थोमबाटू, ओलागुड्डे शहर, जिल्हा : उडपी, कर्नाटक) याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पश्चिमेतील कोपर रोडला असलेल्या कुमार बिल्डिंगमध्ये राहणारी आरती सकपाळ हिची शुक्रवारी संध्याकाळी राहत्या घरात साडीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटचे सिनिअर इन्स्पेक्टर संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली सपोनि भूषण दायमा, फौजदार नितीन मुदगुन, शरद पंजे, मारूती दिघे, मोहन कळमकर, राजेंद्र घोलप, दत्ताराम भोसले, नरेश जोगमार्गे, विलास मालशेटे, निवृत्ती थेरे, सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, मंगेश शिर्के, केशव निकूळे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बंगारा, अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, मिथून राठोड, गुरूनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी, स्वाती काळे हे पथक जंग जंग पछाडत होते. सदर महिला काम करत असलेल्या कल्याणच्या रूचिरा बार येथे काम करणारा श्रीनिवास मडीवाल याच्यावर क्राईम ब्रँचच्या संशयाची सुई स्थिरावली. आरती हिच्या मोबाईलचा सीडीआर तपासला. त्यात तिच्यासोबत बारमध्ये करणारा तिचा सहकारी श्रीनिवास मडीवाल याच्याशी दररोज बोलणे होत असल्याचे उघड झाले.
श्रीनिवास याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून त्याला कल्याण स्टेशनच्या पुलावरून ताब्यात घेतले. श्रीनिवास मडीवाल यानेच त्याच्या प्रेयसीचा खात्मा केल्याची क्राईम ब्रँचला खात्री पटली. अशाप्रकारे आरतीच्या खुन्याच्या क्राईम ब्रँचने अवघ्या 24 तासांच्या आत मुसक्या आवळल्या. आरतीची हत्या आर्थिक आणि अनैतिक संबंधातून केल्याची माहिती हाती आली. ही हत्या आर्थिक आणि अनैतिक संबंधातून केल्याची त्याने कबुली दिली. रविवारी कल्याण सत्र न्यायालयाने आरोपी श्रीनिवास याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे विष्णूनगर पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.