राज्यात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. देशातील अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीकरणाची गती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे, याची सर्वांना कल्पना आहे. अशावेळी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट देत पाहणी केली. त्यावेळी कोरोना लसीच्या निर्मितीबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी महत्वाची माहिती दिली आहे.
मी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विषय मांडला आहे. हाफकिन ही देशाला पोलिओ मुक्त करणारी संस्था आहे. तिची कल्पना पंतप्रधानांना दिली आहे. या संस्थेला पुन्हा ताकद देण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. संशोधन आणि क्षमता वाढवण्यासाठी सरकार संस्थेच्या पाठीशी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
लस निर्मिती कंपन्यांसोबत बोलणी सुरु
लस बनवणाऱ्या इतर ज्या कंपन्या आहेत. त्यांच्याशी बोलणी सुरु आहे. तसंच राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेत सातत्याने संशोधन सुरु राहील, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोरोना लसीबाबत राजकारण करायचं नाही. केंद्र सरकारनं सांगितलं आहे की, तुम्हाला मागणीनुसार पुरवठा केला जाईल. त्यांनी वर्गवारी करुन दिलेली आहे. पण या संकटातून लवकर बाहेर पडण्यासाठी लसींचा पुरवठा वाढवावा लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं स्पष्ट दिसत आहे. अशावेळी नागरिकांनी सरकारने घालून दिलेले नियम पाळणं गरजेचं आहे. भाजी मंडई किंवा अन्य ठिकाणी होणारी गर्दी टाळली पाहिजे. रुग्णसंख्या वाढतच गेली तर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल, असे स्पष्ट संकेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘भारत बायोटेकचं तंत्रज्ञान हाफकिनलाही मिळावं’
राज्य सरकारने केंद्राकडे अजून एक महत्वाची मागणी केली आहे. त्यात भारत बायोटेकच्या लसीचं तंत्रज्ञान महाराष्ट्राला देण्यात यावं. महाराष्ट्र सरकार त्याचा वापर करुन हाफकिनकडून लस निर्मिती करेल. अथवा महाराष्ट्र सरकारच्या सर्व संसाधनांचा वापर करुन केंद्रानं सर्व पुरवठा करावा, आम्ही फक्त ‘फिल अॅन्ड फिनिश’ करुन ते केंद्राला देण्यात येईल. या मागणीला पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. ही मागणी मान्य झाल्यास या द्वारे जे उत्पादन होईल त्यातील 25 टक्के वाटा महाराष्ट्राला देण्याची अट घातली जाईल, असंही टोपे म्हणाले.