अकोला : खदान पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुन्या आरटीओ रस्त्यावरील स्वप्नशिल्प अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर एका ६० वर्षीय वृद्धेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा संशयावरून मृत वृद्धेच्या मुलीला अटक केली आहे. पैशांच्या लोभातून हा खून झाल्याचा संशय असून, पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. अटक केलेल्या मुलीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाईल.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या आरटीओ रोडवरील हनुमान मंदिराच्या पुढे असलेल्या स्वप्नशिल्प अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर ६० वर्षीय सरोबाई कांडेलकर आणि तिची विधवा मुलगी कविता बावसकर (४०) या राहतात. कविताचा मुलगा पुणे येथील एका इंजिनीअरींग कॉलेजचा विद्यार्थी आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास स्वयंपाक खोलीत सरोबाई कांडेलकर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच खदान पोलिस स्टेशनचे निरीक्षक डी. सी. खंडेराव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शैलेश सपकाळ पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हत्येचा संशयावरून मृत महिलेच्या मुलीस चौकशीसाठी रात्रीच ताब्यात घेतले होते. गुरुवारी सायंकाळी तिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. शुक्रवारी तिला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक खंडेराव यांनी दिली.
आरोपी मुलगी पोलिस कोठडीत
जुने आरटीओ रोडवरील सखुबाई कांडेलकर यांचा खून करणारी मृतकाची मुलगी मुख्य आरोपी कविता बावस्करला शुक्रवारी खदान पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तिला दोन दिवस ता. १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी पुढे येण्याची शक्यता आहे. न्यायालयात आरोपी कविता बावस्करची बाजू ॲड. नरेंद्र बेलसरे यांनी मांडली.