नवी दिल्ली – सध्याच्या जगात काळ-वेळ बदलली की माणसं देखील बदलतात. गरजेच्या वेळीच आपली साध सोडतात. मात्र प्राण्यांच्या इमानदारीची अनेक उदाहरण आपण ऐकली आहे. एकदा माणसाने त्यांना जीव लावला की ते त्याची साथ कायम देतात. अशीच एक घटना बिहारच्या पाटणामध्ये पाहायला मिळाली आहे, आपल्या मुलाला संपतीतून बेदखल करत एका व्यक्तीने तब्बल पाच कोटींची संपत्ती ही हत्तींच्या नावावर केल्याची घटना समोर आली आहे. पाटणाजवळील दानापूरच्या जानीपूर परिसरात राहाणाऱ्या अख्तर इमाम असं या व्यक्तीचं नाव आहे. अख्तर यांनी सर्व लोक हाथी काका या नावानंच ओळखतात. या नावामागची कथाही अतिशय रंजक आहे.
अख्तर यांनी आपल्या मुलाला जमीन आणि संपत्तीतून बेदखल केलं आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी आपली सगळी संपत्ती आपल्याकडे असणाऱ्या दोन हत्तींच्या नावावर केली आहे. मुलाला बेदखल करुन आता नऊ महिने झाले आहेत, मात्र अख्तर यांना कधीच एकटं असल्यासारखं वाटत नाही. कारण मुलापेक्षा त्यांचा हत्तींवर जास्त विश्वास आहे. याच कारणामुळं लोक त्यांना हाथी काका म्हणतात. अख्तर यांच्याकडे दोन हत्ती आहेत. एकाचं नाव राणी तर दुसऱ्याचं नाव मोती आहे. अख्तर यांचा संपूर्ण दिवस याच दोघांसोबत जातो. आपली पाच कोटींची जमीन हत्तींच्या नावावर केल्यानंतर अख्तर लोकप्रिय झाले.
आपल्या संपत्तीचं विभाजन हाथी काकांनी दोन भागात केलं आहे. पहिला हिस्सा त्यांनी पत्नीच्या नावावर केला आहे. तर दुसऱ्या हिस्सा हत्तींच्या नावावर केला आहे. जर उद्या मी राहिलो नाही तर माझं घर, बँक बॅलन्स, जमीन आणि सगळी संपत्ती हत्तींची होईल. हत्तींना काही झाल्यास त्यांच्या वाट्याची संपत्ती ऐरावत संस्थेला मिळेल असं काकांनी म्हटलं आहे. तसेच त्यांचं जीवन हत्तींनाच समर्पित आहे. हे हत्तीदेखील त्यांच्यासाठी एखाद्या जोडीदारापेक्षा कमी नाहीत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. अख्तर यांना आपल्या एकुलत्या एका मुलाला संपत्तीतून बेदखल केल्याचं जराही दुःख नाही.
“मुलगा मिराज उर्फ पिंटू नालायक निघाला. त्याने मला आपल्या प्रेयसीच्या बलात्कार प्रकरणात खोट्या केसमध्ये अडकवलं होतं. यामुळं मला तुरुंगातही जावं लागलं होतं. तपासादरम्यान हे आरोप खोटे सिद्ध झाले आणि माझी सुटका झाली. मुलाने माझ्या हत्तींना मारण्याचाही प्रयत्न केला मात्र तो पकडला गेला. यानंतर मी हत्तींच्या नावावर संपत्ती करण्याचा निर्णय घेतला” अशी माहिती अख्तर यांनी दिली आहे. तसेच एकदा दोन लोक हत्यारं घेऊन त्यांना मारण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी हत्तींनीच मोठमोठ्यानं आवाज करत आसपासच्या लोकांना उठवलं. हा आवाज ऐकून हत्यारं घेऊन आलेल्या दोघांनी पळ काढला आणि माझा जीव वाचवला असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.