मुंबई : मुंबईतील सहा महिन्याच्या तीराला हवं असणारे १६ कोटींचे ते इंजेक्शन अखेर तिला मिळाले आहे. क्राउड फंडिंगच्या माध्यमातून तीरावर उपचारासाठी संबंध माणुसकी एकवटली होती. ते औषध नुकतेच अमेरिकेहून आले आणि आणि आज डॉक्टरांनी ते औषध तीराला दिले. माहीमच्या पी. डी हिंदुजा रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे औषध दिल्यानंतर तीराला शनिवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. गेली काही महिने तीराच्या पालकांनी हे औषध तीराला मिळावे यासाठी मोठा संघर्ष केला. आज अखेर तिला हे औषध देण्यात आले असून तिची तब्येत लवकर ठिक व्हावी म्हणून तीरासाठी अनेकांनी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या, त्या सर्वासाठी ही आनंददायी बातमी ठरली आहे.
पाच महिन्यांच्या तीरा कामत या चिमुकलीवर उपचारासाठी १६ कोटींचे औषध लागणार होते. मात्र हे औषध भारतात उपलब्ध होण्यासाठी तब्बल १६ कोटी रुपयांचा खर्च येणार होता. यासाठी देशातून अनेक ठिकाणाहून तीराच्या आईवडिलांनी केलेल्या आवाहनानुसार क्राउड फंडिंग करण्यात आले. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या बद्दल माहिती देऊन या औषधावरील आयात शुल्क माफ करण्याची विनंती सुद्धा केली होती. केंद्राने लगेचच यावर निर्णय घेऊन सदर औषधांवरील आयात शुल्क आणि त्यावरील संपूर्ण करमाफ केला. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते.
तीरा कामत या चिमुकलीवर जीन रिप्लेसमेंटच्या उपचारांची अत्यंत गरज आहे. तिच्यावरील उपचारासाठी लोकांनी १६ कोटी रुपये गोळा करून मोठे योगदान दिलेले आहे. तीराच्या पुढील उपचारासाठी ‘झोलजेन्स्मा’ नावाचे अत्यंत महागडे औषध अमेरिकेतून आयात करावे लागणार होते.
‘झोलजेन्स्मा’ औषध भारतात आणण्यासाठी जीएसटी, कस्टम करांसहीत अंदाजे साडे सहा कोटी रुपयांचा ज्यादा खर्च येणार होता. या करातून सूट मिळावी, यासाठी तिराच्या आई-वडिलांनी राज्य व केंद्र सरकारकडे विनंती केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्याचा पाठपुरावा केला होता. यासंबंधी फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र पाठवून करातून सूट मिळावी यासाठी विनंती केली होती. पंतप्रधान मोदींना ही बाब महत्वाची असल्याचे लक्षात आल्यामुळे तातडीने निर्देश दिले. त्यावर वेगाने कार्यवाही करत औषधावरील सर्व कर माफ करण्यात आले. वित्त विभागाने यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत तीरा कामतला दिर्घायुष्य लाभो, अशाही शुभेच्छा दिल्या होत्या. आता तीराला हे औषध मिळाल्यामुळे तिच्या सर्व हितचिंतकांनी आनंद व्यक्त केला आहे.