अकोला : मुंबईवरून नागपूरला जाणाऱ्या महिलेस अकोला रेल्वे स्थानकावर चुकीच्या रेल्वेमध्ये चढल्याच्या कारणावरून उतरून देताना झालेल्या अपघातास रेल्वे प्रशासनास जबाबदार धरून त्या महिलेस नुकसान भरपाई म्हणून सात लाख रुपये देण्याचे निर्देश रेल्वेच्या दावा अधिकरण विभागाने दिले.
नागपूर येथील रहिवासी मीनाक्षी पवनिकर या मुंबईवरून आपल्या कुटुंबासमवेत नगपूरसाठी आरक्षित केलेल्या शालिमार एक्स्प्रेसमध्ये न बसता चुकीने हावडा एक्स्प्रेसमध्ये बसल्या.
अकोला स्थानकात आल्यावर तपासणी करताना टीसीच्या निर्दशनास ही बाब येताच त्यांनी त्या महिलेस गाडीतून खाली उतरविले. या धावपळीत रेल्वे सुरू होऊन मीनाक्षी पवनिकर यांचा अपघात होऊन त्याना विकलांगता आली.
उपचार केल्यानंतर पवणीकर यांनी रेल्वे दावा प्राधिकरण नागपूर येथे खटला दाखल केला. पवणीकर यांचे अभियोक्ता ॲड.अनिल शुक्ला यांनी बाजू मांडली. प्राधिकरणाने उभयतांचे म्हणणे ऐकून अपिलार्थी मीनाक्षी पवनिकर यांना सात लाख दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. यात दोन लाख रोख व उर्वरित रक्कम त्यांच्या नावे मुदत ठेवीत ठेवण्याचे आदेश दिले.