नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि परीक्षा देण्याची शेवटची संधी असणाऱ्या उमेदवारांना आता पुन्हा एक संधी मिळणार आहे. आज (शुक्रवारी) केंद्राने यासंबंधी एक निर्णय जाहीर केला असून या निर्णयामुळे सनदी अधिकारी बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
यूपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ठराविकच प्रयत्नातच परीक्षा देण्याची महत्वाची अट आहे. वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आणि खुल्या गटासाठी परीक्षेसाठी ठराविक संधीच दिली जाते. मात्र गेल्यावर्षी उदभवलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागले होते. वाहतुकीच्या सोयीची अनुपलब्धता असल्यामुळे तसेच लॉकडाऊनमुळे आणि काही विद्यार्थ्यांनाच कोरोना झाल्यामुळे अनेकांना या परीक्षेस मुकावे लागले होते.
यामुळे ज्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा देण्याची शेवटची संधी होती अशा विद्यार्थ्यांमधून पुन्हा एकदा ही परीक्षा देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी होत होती. याविषयी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा सुनावणी झाली होती. त्या सुनावणी मध्ये केंद्राने अशी संधी देण्याविषयी नकार दर्शविला होता.
मात्र केंद्राने आता नव्याने निर्णय जाहीर करून अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची परवानगी दिली आहे.त्यासोबत काही अटीदेखील केंद्राने यामध्ये घातल्या आहेत. त्या अटींच्या अधीन राहूनच पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.सदर निर्णयामुळे अधिकारी होण्याच्या शेवटच्या टप्प्यावर असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.