मुंबई : बलात्काराचा आरोप झाल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्याविरोधात आणखी एक तक्रार झाल्याने त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. रेणू शर्माकडून बलात्काराचा आरोप झाल्यानंतर त्यांनी करुणा शर्मा यांच्याशी संबंध असल्याचे आणि मुलंही असल्याचे कबूल केले होते. आता त्यांनीच तक्रार दाखल केल्याने पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे.
रेणू शर्मा आणि करुणा शर्मा या नात्याने बहिणी आहेत. आता यावेळी करुणा शर्मा यांनी तक्रार दाखल करत सनसनाटी आरोप केला आहे. त्यांनी या वादावर प्रथमच आपली भूमिका मांडताना करुणा यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांचा शासकीय बंगला असलेल्या चित्रकूटवर तीन महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप केला आहे.
त्या आपल्या फेसबुक पोस्टवर म्हणतात की, आज माझा वाढदिवस, पण माझ्या पतींनी माझ्या मुलांना गेल्या तीन महिन्यांपासून चित्रकूट बंगल्यावर लपवून ठेवलं आहे. राजकारणातील ताकद वापरून मला ते भेटू आणि बोलूही देत नाहीत. रावणानेही इतकं टॉर्चर केलं नसत. त्यांनी याबाबत काल (ता.०२) पोस्ट केली होती.