अकोला(प्रतिनिधी)– संपूर्ण देशातील सार्वजनिक उपक्रम विकून ‘आत्मनिर्भर भारत’ च्या वांझोटी घोषणा देणाऱ्या सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे देश विक्रीची “लूट लो इंडिया स्कीम” असून सर्वसामान्य नागरिक आणि युवा वर्गाचा विश्वासघात करणारा अर्थसंकल्प असल्याची टिका वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता तथा प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
अर्थसंकल्पातून पायाभूत विकास आणि शेतकरी, कामगार, युवक युवती, नोकरदार व मध्यमवर्ग तसेच कोरोना मुळे उद्ध्वस्त झालेला लहान मोठा व्यापारी ह्यांचे तोंडाला पाने पुसण्याचे काम अर्थमंत्र्यांनी केले आहे. केवळ मोठ्या कंपनी आणि सरकारचे पाठीराखे उधोगपती ह्यांचे हित लक्षात घेवून सरकारने तरतुदी केल्या आहेत. ना खाऊंगा, ना खाणे दुन्गा अशी फसवी वाक्य वापरून नफयातील पेट्रोलियम कंपन्या, विमानतळ,लालकिल्ला, रेल्वे स्टेशन, विकुन मोकळे झाले आहेत. महामार्ग, वीज वितरण वाहिन्या, , मालवाहतूक, शासकीय गोदामे, गेल, इंडियन ऑयलची पाइप लाइन, स्टेडियम सरकार विकणार आहे. तसेच देशातील सात बंदरेही खासगी कंपन्यांना विनासायास विकण्याची सोय ह्या अर्थसंकल्प मध्ये आहे.
एलआयसी सारखी कंपनी विक्रीवर शिक्कामोर्तब केले असून संरक्षण क्षेत्रात देखील खाजगी आणि नफेखोरी करणारे भांडवलदार घुसविले जाण्याची मुभा दिली आहे.आरोग्य, शिक्षण ह्या सारखे क्षेत्रे देखील विक्रीसाठी खुली केली आहे. एकंदरीत सरकारने जाणीवपूर्वक देश विक्रीचे टेंडर काढले असून आजचा अर्थसंकल्प इंग्रज सरकारच्या भारत लुटीची आठवण करून देणार असल्याचा घणाघात वंचित ने केला आहे.