पुणे : समाजाचं प्रतिबिंब चित्रपट-मालिकांमधून दाखवलं जातं, तर चित्रपट-मालिकांचे प्रतिबिंब समाजामध्ये उमटतं, हा एक जुना वाद आहे. तरीही चित्रपटांचा आणि मालिकांचा प्रभाव लहानांपासून थोरांपर्यत सर्वांच्यावर पडतो, हे अनेक गुन्ह्यांतून सिद्ध झालेले आहे. अशी एक घटना पुण्यातील केळेवाडी परिसरात घडली. ‘दृष्यम’ नावाचा चित्रपट पाहून चक्क १३ वर्षांच्या मुलाने आपल्या ११ वर्षांच्या मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केला आणि मित्राच्या मृतदेहाभोवती सिमेंटचा राडारोडा टाकून बुजविण्याचाही प्रयत्न केला.
घटना पुण्यातील केळेवाडी परिसरात २९ जानेवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. विश्वजीत विनोद वंजारी असे या घटनेत खून झालेल्या ११ वर्षीय मुलाचे नाव आहे. १३ वर्षांच्या आरोपीने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली देऊन हा खून ‘दृष्यम्’ चित्रपटपाहून केल्याचे सांगितले. तसेच त्या अल्पवयीन गुन्हगारी मुलाने पुरावेदेखील दडविण्याचा प्रयत्न केला, असेही पोलिसांनी सांगितले.
कोथरूडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जानेवारीला सायंकाळी विश्वजीत वंजारी हा मुलगा बेपत्ता झाला होता. त्याचे पार्थिव दोन दिवसांनी पौड रस्त्यावरील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मोकळ्या जागेत पोलिसांना सापडले. घटनेचे सविस्तर वृत्त असे की, विश्वजीत वंजारी इयत्ता चौथीत, तर अल्पवयीन आरोपी इयत्ता सातवीत शिकत होते. ते दोघे एकत्र खेळायचे. मात्र, आरोची स्वभाव हा भांडखोर होता. आरोपीला व्हिडीओ गेम खेळता येत नव्हते म्हणून विश्वजीत त्याला चिडवायचा. त्यातून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे.
घटनेदिवशी नेहमीप्रमाणे ते दोघे खेळत होते. पुन्हा व्हिडीओ गेमवरून आरोपीला विश्वजीतने चिडवले. आरोपीला त्याचा प्रचंड राग आला. त्याने ‘खेळताना तू मला सतत एकटे पाडतो म्हणून दोघांमध्ये वाद सुरू झाला अन् दोघांच्यात झटापट सुरू झाली. आरोपीने विश्वजीतचे नाक दाबले आणि त्याला जोरात धक्का दिला. त्यामुळे विश्वजीत बाजूच्या विटांवर जाऊन आदळला. त्याच्या डोक्याला जोरात मार लागल्यामुळे रक्त वाहू लागले. हे पाहून आरोपी प्रचंड घाबरला. आता घरातील लोक रागावतील म्हणून या भीतीने आरोपीने विश्वजीतच्या डोक्यात पुन्हा दगड घातला आणि त्याचा खून केला. मृत्यू पावलेल्या विश्वजीतला लपविण्यासाठी आरोपीने विश्वजीतच्या भोवती सिमेंटचा राडारोडा टाकला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. विश्वजीत बेपत्ता होण्यापूर्वी कोणासोबत होता येथून तपासाला प्रारंभ केला १३ वर्षांच्या आरोपीच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली तेव्हा आरोपीने खून केल्याची कबुली दिली. चौकशीमध्ये आरोपीने सांगितले की, दृष्यम चित्रपट पाहून हा खून केला असल्याची कबुली दिली.