अकोला : विदर्भच नव्हे महाराष्ट्रात सातत्याने सक्रीयपणे काम करण्यासाठी ओळख बनलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणुक कार्यक्रमाचे विविध टप्पे नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.
जिल्हा बँकेचे अकोला व वाशीम जिल्हा कार्यक्षेत्र आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तीजापूर, बार्शीटाकळी या सात आणि वाशीम जिल्ह्यातील वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा या सहा अशा एकूण १३ तालुक्यातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निवडणुकीच्या अनुषंगाने विविध टप्पे जाहीर झाले आहेत. यात शुक्रवार (ता.२२) पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. सोमवारी (ता.२५) दाखल अर्जांची छाननी केली जाईल. यानंतर बुधवारी (ता.२७) रिंगणातील उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात येतील.
१० फेब्रूवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. ११ फेब्रूवारीला रिंगणात राहलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळेल. त्यानंतर २० फेब्रूवारीला प्रत्यक्ष मतदान होईल. या निवडणुकीसाठी दोन्ही जिल्ह्यातील सुमारे १२०० मतदार मतदान करू शकणार आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे आता महिनाभर सहकार क्षेत्राचे वातावरण तापणार आहे. अनेक वर्षांपासून या बँकेवर कोरपे यांची सत्ता टिकून आहे. कोरोनामुळे सहकार क्षेत्रातील निवडणुका आजवर लांबणीवर टाकण्यात आलेल्या होत्या. परंतु निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागली आहे.
मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करीत आहेत.
चुरशीची निवडणूक होण्याची चिन्हे
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातत्याने चोख व्यवहार, कर्ज वसुली व विविध उपक्रमांमुळे चर्चेत असते. विदर्भातील बऱ्याच जिल्हा बँका आर्थिक अडचणीत असताना अकोला जिल्हा बँक मात्र कायम नफ्यात आहे. बँकेने विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवला. त्यामुळे या बँकेच्या निवडणुकीकडे सहकारातील सर्वच दिग्गजांचे लक्ष वेधले आहे. बँक संचालक बनण्यासाठी सहकारातील अनेक जण गुडख्याला बाशींग बांधून तयार आहेत. येत्या काळात काय तडजोडी होतात त्यावरही निवडणुकीचे चित्र अवलंबून असेल.
दोन दिवसात चार अर्ज
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दोन दिवसांत एकूण चार सदस्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केले आहे.