अकोला : सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट कायम असताना, देशात बर्ड फ्लूचे नवे संकट आले आहे. सुदैवाने राज्यात आतापर्यंत बर्ड फ्लूचा एकही अहवाल समोर आलेला नसला तरी, अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे आणि परिसरातील शेत शिवारात काही मृत कावळे आणि पक्षी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.या मृत पक्षाचे नमुने प्रयोग शाळेत पाठवण्यात येणार असून, प्रयोग शाळेतून अहवाल आल्यानंतरच हा बर्ड फ्लू आहे का हे स्पष्ट होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.
अकोला शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दहिगाव गावंडे येथे काही मृत कावळे आढळून आलेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खबरदारी बाळगत या कावळ्याचे मृतदेह सुरक्षितपणे गोळा केले असून, नमुणे चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याची तयारी केली आहे. खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत अकोला जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यात आतापर्यंत बर्ड फ्लूमुळे एकाही पक्ष्याचा मृत्यू झालेला नाही. मात्र सतर्कता बाळगत शासनाने राज्यभरात अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. तुषार बावणे यांनी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात कुठेही पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्यास त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बर्ड फ्लू दोन प्रकारचे असून, एक वन्य पक्षांपासून वन्य पक्षांना होणारा तर दुसरा पक्षांपासून मानवाला होणार आहे. देशात आतापर्यंत जे मृत पक्षी आढळलेत ते वन्य पक्षांपासून वन्य पक्षांना होणाऱ्या बर्ड फ्लूच्या प्रकारातील आहेत. अकोला जिल्ह्यातही काही ठिकाणी मृत पक्षी आढळले आहेत. त्यांचे नमुणे चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्चित माहिती कळेल. तोपर्यंत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
– डॉ. तुषार बावणे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग,अकोला