अकोला – येथील ३०- अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत २६ हजार ५८७ मतदार असे आहेत ज्यांची छायाचित्रे नाहीत. अशा मतदारांची यादी ही संबंधित मतदान केंद्रावर, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या www.akola.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी ज्या मतदारांच्या नावापुढे छायाचित्र नसेल त्यांनी दोन दिवसांच्या आत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा करावीत, अन्यथा ही नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, असे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी ३०- अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघ यांनी आवाहन केले आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार, मतदार यादीमध्ये मतदारांचे छायाचित्र नसणे, मतदार ओळखपत्र क्रमांक नसणे अशा मतदारांची छायाचित्रे घेऊन मतदार यादी अद्यावत करावी व जे मतदार त्या भागात रहात नाहीत किंवा आढळून येत नाहीत त्यांच्याबाबत रितसर नावे वगळण्याबाबत कार्यवाही करण्यात आली. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन यादी अद्यावत केली आहे. याअंतर्गत ३०-अकोला पश्चिम या विधानसभा मतदार संघात २६ हजार ५८७ मतदार असे आहेत ज्यांचे छायाचित्र नाहीत. तथापि असे वगळ्यास पात्र असलेल्या मतदारांची यादी संबंधित मतदान केंद्रावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.akola.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी अशा मतदारांनी आपली छायाचित्रे येत्या दोन दिवसांत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना द्यावी, अन्यथा त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल,असे कळविण्यात आले आहे.