तेल्हारा : तालुक्यातील शेतकर्यांसाठी एकमेव उत्पन्न वाढीचा स्रोत असलेल्या वान धरणातून बाळापूर तालुक्यातील 69 गावांसाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासन निर्णय पारित करण्यात आला यामुळे तालुक्याला पुन्हा अत्याचाराला सामोरे जावे लागले असून हक्काच्या पाण्याला मुकावे लागणार आहे अशी संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिक आणि शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यात 106 गावे असतानासुद्धा फक्त मोठ्या चार ते पाच गावात पिण्याचे पाणी पोहोचले आहे परिणामस्वरूप तालुक्यातील 100 गावांच्या वर गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याने या गावांमध्ये किडनी आजारांनी डोके वर काढले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे.
सर्वात गांभीर्याची बाब म्हणजे कालच पंजाब व हरियानातील शेतकर्यांसाठी धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या विविध पक्षातील नेत्यांनी मात्र तेल्हारा तालुक्यातील शेतकर्यांना वार्यावर सोडले व कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण सत्यात उतरविली असल्याची प्रखर टीका येथील नागरिकांनी केली आहे.