मुंबई : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणारे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची दाट शक्यता आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हे अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार होते. दरवर्षी नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. अधिवेशन मुंबईत कधीपासून घ्यायचे याचा निर्णय नोव्हेंबरच्या शेवटी समितीची पुन्हा बैठक घेऊन निश्चित केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. तथापि, ही बैठक आता ३ डिसेंबरला होणार आहे.
संसदेचे अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले. मुंबईतील अधिवेशनही रद्द होणार अशी चर्चा पाठोपाठ सुरू झाली. मात्र, निदान चार दिवसांचे तरी अधिवेशन घ्यावे असा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अध्यक्ष पटोले यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण
विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची १ डिसेंबर २०१९ रोजी बिनविरोध निवड झाली होती, त्याला मंगळवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. युपीएससी विद्यार्थ्यांचा विधानभवनात सत्कार, नागपूरच्या विधानभवनात कायमस्वरुपी अस्थापना सुरू करणे, त्या ठिकाणी संसदीय प्रशिक्षण केंद्र व्हावे यासाठी पाठपुरावा अशा अनेक कामांसाठी त्यांनी पुढाकार घेतला.