चाळीसगाव : अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील २१ वर्षाचे जवान भारत मातेचे रक्षण करताना शहीद झाले. यश डिगंबर देशमुख असे या जवानाचे नाव आहे. यश अतिरेक्यांशी लढतांना शहीद झाल्याची बातमी गावात धडकताच गावकऱ्यांचा काळजाचा ठोकाच चुकला. आताशी कुठे जीवनाची सुरूवात करणाऱ्या आणि देश सेवेचे मोठे स्वप्न घेऊन काश्मिरमध्ये तैनात असलेल्या यशचे असे अचानक जाण्याने गावकरी सुन्न झाले आहेत. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे. यश यांचे पार्थिव दिल्ली येथून रवाना झाले असून रात्री नाशिकमध्ये येणार आहे. त्यानंतर ते शनिवारी (दि २८) सकाळी मूळ गावी पिंपळगाव येथे आणण्यात आल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सिमेवर लढणाऱ्या जवानांचा हकनाक बळी घेणाऱ्या अतिरेक्यांचा सरकारने बिमोड करावी अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी या दु:खद घटनेप्रसंगी व्यक्त केल्या आहेत. शहीद जवानाच्या पार्थिवाकडे कुटुंबासह गावकरी आस लावून बसले आहेत. दरम्यान, शहीद जवानाचे पार्थिव उद्या औरंगाबादहून चाळीसगाव येथे सकाळी येण्याची शक्यता असून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घोडेगाव रस्त्यावर मोकळ्या पटांगणावर जवानाला शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला जाणार आहे. अंत्यंस्काराची तालुका प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे.
श्रीनगर शहराबाहेरील एचएमटी परिसरात दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या लष्कराच्या शीघ्र कृती दलावर बेछूट गोळीबार केली. रहदारीचा भाग असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका पोहचू नये, यासाठी लष्कराच्या जवानांनी कारवाईदरम्यान संयम बाळगला. मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबारात यश देशमुख यांच्यासह दोघे जवान गंभीररित्या जखमी झाले. उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यश देशमुख हे ११ महिन्यांपूर्वी पुणे येथे सैन्य दलात पॅराकंमाडो म्हणून भरती झाले होते. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ते दोन महिन्यांपूर्वीच श्रीनगर येथे रूजू झाले होते. यश यांच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांच्या आईला धक्का बसला व त्या बेशुद्ध झाल्या. यश देशमुख यांच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. यश यांचे वडील शेतकरी असून, लहान भावाचे बारावीचे शिक्षण झाले आहे. यश हे अत्यंत कुटुंबवत्सल व मनमिळावू होते. घराची जबाबदारी असल्याने सवड झाली की सतत आई-वडिलांना फोन करून खुशाली विचारायचे. गावातले मित्र, शेजारी व परिचितांनाही फोन करून चौकशी करायचे. दोनच दिवसांपूर्वीच त्यांनी घरी फोन करून तब्येतीची विचारपूस केली होती. हा त्यांचा कुटुंबीयांशी शेवटचा संवाद होता.
गाव बुडाले शोकसागरात
यश देशमुख यांच्या बलिदानाने अवघे गाव शोकसागरात बुडाले आहे. काल सायंकाळी गावात ही माहिती मिळाल्यापासून अख्खे गाव शोकसागरात बुडाले. रात्री गावाचा डोळ्याला डोळा लागला नाही. गावकऱ्यांनी रात्र जागून काढली. यश याचे पार्थिव उद्या शनिवारी सकाळी येण्याची शक्यता असून तालुका प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी चालवली आहे. उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार अमोल मोरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांनी पिंपळगाव येथे भेट देवून शहीद जवान यांच्या कुटुबियांचे सांत्वन केले. आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट देवून देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले. गावकऱ्यांना आता शहीद जवानाच्या पार्थिवाची आस लागली आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. गावापासून जवळ असलेल्या घोडेगाव रस्त्यावर मोकळ्या पटांगणावर शहीद जवानाला सकाळी १० वाजता अखेरचा निरोप दिला जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.
अखेरचा निरोप देण्यासाठी गाव सज्ज
गावाचा सुपुत्र देशाचे रक्षण करताना शहीद झाल्याचे दु:ख गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर असले तरी अखेरचा आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी गावकरी सज्ज झाले आहेत. गावात ठिकठिकाणी शहीद जवान यश देशमुख यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावण्यात आले असून देशभक्तीपर गीतांना गावातील वातावरण धीर गंभीर बनले आहे. अंत्यंसंस्काराप्रसंगी तब्बल १५ क्विंटल झेंडुची फुले मागवण्यात आली आहे. सजवलेल्या वाहनातून शहीद जवान यश देशमुख यांचे पार्थिव नेण्यात येणार आहे. गावात प्रत्येक घरासमोर रांगोळ्या टाकण्यात येणार आहे.
चाळीसगाव ते पिंपळगाव पर्यंत बॅनर
देशासाठी रक्षण करतांना शहीद झालेले यश देशमुख यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर चाळीसगाव शहरात जागोजागी लावण्यात आले आहेत. तसेच चाळीसगाव ते पिंपळगाव या 22 किमी दरम्यानही दुतर्फा श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात येणार आहेत.