नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे आज (ता.२५) पहाटे तीन वाजता निधन झाले. त्यांना प्रकृतीमध्ये झालेल्या गुंतागुतीमुळे गुडगावच्या मेदांता रुग्णालयाच्या इंटेंसिव्ह केअर युनिटमध्ये (आयसीयू) दाखल करण्यात आले होते. त्यांचा मुलगा फैसल पटेल यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. अहमद पटेल यांना काही आठवड्यांपूर्वी कोरोना व्हायरसची लागण झाली होती. ७१ वर्षीय अहमद पटेल यांनी १ ऑक्टोबरला ट्विट केले होते की, त्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
फैसल पटेल यांनी ट्विट करून माहिती दिली की २५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडे तीन वाजता माझे वडील अहमद पटेल यांचे निधन झाले. सुमारे एक महिन्यांपूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांची तब्येत खालावली होती. त्यांच्या शरीराच्या अनेक अंगांनी काम करणे थांबवले होते. फैसल यांनी आपल्या सर्व हितचिंतकांना कोविड १९ नुसार सर्व नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. गर्दी करू नका आणि सामाजिक अंतराचे अनुसरण करा असे त्यांनी म्हटले आहे.