पाटणा : जेडीयू नेते नितीशकुमार यांनी आज सोमवारी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. त्यांच्यासह काही मंत्र्यांचा शपथविधी राजभवनवर पार पडत आहे. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा होत आहे. शपथविधी सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, बिहारचे भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून तर्कवितर्क लढवले जात होते. मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. दुसरीकडे निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, असे जाहीरपणे सांगितले होते. निकालानंतर भाजपच्या दिल्ली मुख्यालयात आयोजित विजयी सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांच्याच नेतृत्वाखाली बिहारच्या विकासाला गती देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे संभ्रम संपला होता आणि आज नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.