अकोला(प्रतिनिधी)- रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था (आयआयएम) अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘सर फाऊंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२०’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार अकोला जिल्ह्यातील पाचमोरी जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका श्रीमती मनिषा शेजोळे यांना जाहीर झाला असून, त्यांनी शालेय स्तरावर विविध उपक्रम व शैक्षणिक प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नवोपक्रमांची निवड करण्यात आली आहे.
सर फाऊंडेशन व आयआयएम, अहमदाबादच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीयस्तर नवोपक्रम स्पर्धा २०२०’ मधून देशभरातील १६९ प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांना ‘सर फाऊंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘एज्युकेशन इनोव्हेशन बँक’ या प्रकल्पांतर्गत हे अवॉर्ड जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर तज्ज्ञ कमिटीमार्फत ही निवड केली जाते. हा पुरस्कार वितरण सोहळा लॉकडाऊन शिथिल झाल्यावर डिसेंबर २०२० मध्ये आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्समध्ये संपन्न होणार असून, यावेळी सर्व नवोपक्रमशील पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार असून, या सोहळ्यास शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या ‘एज्युकेशनल इनोव्हेशन्स कॉन्फरन्स २०२०’ मध्ये विविध विषयावर शैक्षणिक मंथन होणार आहे. शिक्षणतज्ज्ञ व्याख्यान, परिसंवाद, गटचर्चा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमाची मेजवानी याठिकाणी सहभागी शिक्षकांना मिळणार आहे.
सोलापूर येथे मुख्य कार्यालय असलेले ‘सर फाउंडेशन’ हे देशातील उपक्रमशील शिक्षकांचे एक अग्रगण्य नेटवर्क आहे. ‘सर फाउंडेशन’ हे सन २००६ पासून देशातील नवोपक्रमशील शिक्षकांसाठी सतत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून प्रेरणादायी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असते. याचे बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे, सिद्धाराम माशाळे हे राज्य समन्वयक आहेत. राजकिरण चव्हाण आणि अनघा जहागीरदार हे सोलापूर जिल्हा समन्वयक असून, ते सर फाउंडेशनची धुरा सांभाळत आहेत.
साने गुरूजी शिक्षक सेवासंघाच्या जिल्हा महिला प्रतिनिधी मनिषा शेजोळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण व सातत्यपूर्ण भरीव कार्यामुळेच ‘टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड’च्या मानकरी ठरल्या आहेत. याबद्दल त्यांच्यावर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी, पदाधिकारी, शिक्षणप्रेमी तसेच जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.