मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि राज्य सरकार त्यांच्या वादात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे.कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या मनपाच्या कारवाईवर कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अजोय मेहता यांना राजभवनावर बोलावून कंगना प्रकारणाची माहिती घेतल्याचे समजते.
कंगना राणावत हिच्या कार्यालयावर झालेली कारवाई आणि सरकारची भूमिका याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे समजत आहे.तर मानपाने केलेली ही कारवाई राज्यपालांना पटलेली नाही.या पार्श्वभूमीवर कंगना प्रकरणावरून सुरू असलेल्या या वादावर राज्यपाल केंद्राकडे अहवाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार पुढील आव्हाने अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. कंगनाच्या विधानानांतर मनपाकडून झालेल्या धडक कारवाईवर राज्यपालांनी नापसंती दर्शवली असून ही नाराजी त्यांनी अजोय मेहता यांच्यामार्फत उद्धव ठाकरेंकडे पोहोचवण्यास सांगितले असल्याची माहिती आहे.
दरम्यान, मनपाच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केली. सध्याची परिस्थिती लक्षात घेता केलेली कारवाई पाहून लोकांच्या मनात आपण संशय निर्माण होण्याची संधी देत आहोत, असे शरद पवार म्हणाले. तर बुधवारी रात्री उशिरा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक झाली. सध्याचे कंगना राणावत प्रकरण आणि मराठा आरक्षणावरून त्यांच्यात चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.