संस्थाचालकाचा हलगर्जीपणा विद्यार्थ्यांच्या जीवावर
पातूर (सुनिल गाडगे) : जगभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील 4 महिन्यांपासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.त्यापैकी एक म्हणजे संपूर्ण ताळेबंदी, भारतात देखील याचप्रकारची ताळेबंदी सुरू असतांना प्रशासनाकडून काही नियमनिर्देश लागू करण्यात आले होते. या नियमांना हरताळ फसण्याचे काम पातूर शहरातील एका खाजगी संस्थाचालकाकडून सतत होत आहे.याविरुद्ध बेरार की आवाज या वृत्तपत्राचे मुख्य संपादक अनवर खान यांनी स्थानिक प्रशासनाकडे तक्रार देखील दाखल केली होती.परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाही अथवा समज देखील दिला नसल्याने या संस्थेने संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात देखील शिक्षक-पालक मेळावे भरवणे, कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या अकोला शहरातील कंटेनमेंट झोनमधून शिक्षकांचे येणे-जाणे सुरूच होते.त्याचाच पडसाद उमटत आज या संस्थेत कार्यरत एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.शासनाचे नियम झुगारून या संस्थेने वर्ग भरवणे सुरू करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा निंदनीय प्रकार घडवला.
सदर पॉझिटिव्ह शिक्षक इतर सहकारी शिक्षकांच्या संपर्कात आलेला आहे,तसेच शाळेत येणाऱ्या किती विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला असेल.प्रशासनाने याचा शोध घेऊन त्या सर्वांची तपासणी करणे गरजेचे आहे.पातूर शहरातून कोरोना हद्दपार होत असतांना अशा संस्थेच्या व संस्थाचालकाच्या मुजोरपणामूळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून यामुळे जर आणखी काही विद्यार्थी अथवा त्यांचे पालक यांना लागण झाल्यास याला जबाबदार कोण?
चौकट : या संस्थेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संबंधित विद्यार्थी-पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्मित झाले असून,संस्थेची बदनामी होऊ नये म्हणून सदर संस्था प्रशासनाकडून “हा शिक्षक बरेच दिवसांपासून शाळेत येत नव्हता, त्यामुळे आपल्या शाळेतील कोणीही बाधित होणार नाही.” अशा प्रकारची सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात येत आहे.
या अगोदरच अनवर खान यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाही केली असती तर सदर शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार केंव्हाच बंद झाला असता. आज पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकामुळे जर कोणी सहकारी शिक्षक अथवा विद्यार्थी,त्यांचे पालक बाधित झाले तर त्याला शाळा प्रशासन तर जबाबदार असेलच पण त्याचबरोबर योग्यवेळी कारवाही न करणारे तहसीलदार, ठाणेदार, शिक्षणअधिकारी,कोरोना पथक देखील जबाबदार राहतील.
शहरातील नामांकित असलेल्या संस्थेत घडलेल्या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून या शाळेतील सर्व शिक्षक तसेच कर्मचारी , विद्यार्थी यांची तपासणी करण्यात यायला पाहिजे असे मत काही सुजाण नागरिकांडुन व्यक्त होत आहे.