अकोला – येत्या शनिवार दि.15 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 73 वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. हा दिवस साजरा करतांना यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर स्वातंत्र्य दिन समारंभ हा सामाजिक अंतर राखून साजरा केला जावा यासाठी सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.
स्वातंत्र्य दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनाचा सोहळा साजरा करण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उपस्थितांना स्वातंत्र दिन साजरा करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दि.10 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध एका परिपत्रकाद्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांची माहिती दिली.
अकोला जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्याचे राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला येथे सकाळी 9 वा 5 मि. नी होईल. या कार्यक्रमास उपस्थित राहता यावे यासाठी सकाळी 8 वा 35 ते 9 वा. 35 मि. दरम्यान अन्यत्र कुठेही कार्यक्रम घेण्यात येऊ नये अशी सुचनाही देण्यात आली आहे.
राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्याचे निर्देश
राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी कागदी व प्लास्टिक पासून बनवलेल्या राष्ट्रध्वजांचा वापर करण्यास मान्यता नसल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाचे निर्देश आहेत. तथापि हा वापर थांबविण्याबाबत जिल्हा व तालुकास्तरावर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. असे ध्वज कुठे आढळल्यास ते गोळा करुन तालुका व जिल्हास्तरीय यंत्रणेकडे सनामाने सुपूर्द करावेत,असे आवाहन करण्यात आले. या संदर्भात जनजागृती करण्याच्या क्षेत्रीय कार्यालयांना सुचना देण्यात आल्या आहेत.
सामाजिक अंतर राखून कार्यक्रमाचे आयोजन
कोरोना विषाणूची पार्श्वभुमी लक्षात घेता स्वातंत्र्य दिनाचा संपुर्ण कार्यक्रम हा सामाजिक अंतर राखण्याबाबत गृह मंत्रालय व आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन साजरा करावा. या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या साऱ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.