अकोला- इयत्ता नववी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक करिअर कसे निवडावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्याचे हेतूने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोला द्वारे तालुका निहाय वेबिनार मालिकेचे चे आयोजन करण्यात आले आहे. याच मालिकेत आज बार्शीटाकळी तालुक्यातील विद्यार्थी वर्गासाठी “10 वी 12 वी नंतर अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण, सेवा व रोजगार संधी ” या विषयावर एक दिवसीय वेबिनार आयोजित करण्यात आला होता. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.समाधान डुकरे यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या ऑनलाइन कार्यक्रम प्रसंगी , कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, अकोलाचे प्रा. डॉ. गोपाल झांमरे, जिल्हा समुपदेशक नीता जाधव यांची विशेष उपस्थिती होती.
भविष्यातील आव्हानांचा अंदाज घेत जो शिक्षणक्रम मनापासून आवडतो त्यातच आपले करिअर करा व केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार सुद्धा तितकाच मानसन्मान देणारा व अर्थप्राप्ती देणारा असतो याची सुद्धा जाणीव ठेवा असे भावनिक आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर समाधान डुकरे यांनी केले. दहावी-बारावी नंतर काय या करिअर विषयक एक दिवस वेबिनार उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते केवळ पालकांनी सांगितले, मित्रानी, शेजाऱ्यांनी प्रवेश घेतला म्हणून किंवा कोणताही शिक्षणक्रम न स्वीकारता स्वतःमधील अंतर्मनाचा वेध घेत आपल्या क्षमता आवड जिद्द व भविष्यातील आव्हाने यांचा योग्य ताळमेळ साधत निवडलेल्या अभ्यासक्रमातून आपली निश्चितच प्रगती होईल असे आशादायक विधान सुद्धा डॉ. डुकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांनी युनिसेफ च्या सहयोगातून साकारलेले “महाकरियर पोर्टल”हे शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विषयक माहितीचा खजिनाच असून तब्बल 500 वर पदवी पदविका अभ्यासक्रमाच्या संधी सह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शैक्षणिक प्रतिष्ठाने, शिष्यवृत्ती सोबतच रोजगारा सह वैविध्यपूर्ण माहिती महाकरियर पोर्टलवर उपलब्ध असून इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सरल नोंदणी क्रमांक वापरून महाकरियर पोर्टल वर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या जिल्हा समुपदेशक कुमारी नीता जाधव यांनी “दहावी आणि बारावी नंतर विविध व्यावसायिक क्षेत्रातील अभ्यास पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमांच्या संधी व निवड” या विषयावर सविस्तर मार्गदर्शनात केले.
अभ्यासक्रम निवडताना घेण्याची काळजी, योग्य शैक्षणिक वातावरण, स्वतःतील क्षमता, आवड तसेच विविध संधी उनिवा, सभोवतालची परिस्थिती आदींचा अंदाज घेत अभ्यासक्रमाची व करीयरची सांगड कशी घालावी हे सांगतानाच श्रीमती जाधव यांनी विज्ञान कला वाणिज्य व इतर अनेकानेक पदवी तथा पदविका अभ्यासक्रमाविषयी तसेच भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी कौशल्यपूर्ण करिअरची निवड शास्त्रीय पद्धतीने कशी करावी याविषयी आपल्या सादरीकरणात विद्यार्थ्यांना अवगत केले. तर तांत्रिक सत्राचे दुसऱ्या टप्प्यात अकोला येथील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रा. डॉ. गोपाल झांमरे यांनी आपल्या अतिशय ओघवत्या आणि अनुभवाधारित शैलीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावी-बारावीनंतर अभियांत्रिकी शाखेतील विविध पदविका व पदवी अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली व रोजगार तथा स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उदाहरणासह सहजतेने अवगत केल्या अगदी फिनाईल उदबत्ती सॅनिटायझर बनविण्यापासून तर पार रॉकेट सायन्स पर्यंतच्या विविध संधी याविषयी अतिशय तळमळीने आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुरेखा नागपूरे, विषय साधन व्यक्ती, पंचायत समिती बार्शिटाकळी यांनी तर आभार प्रदर्शन श्री. चंदनशिव , विशेष तज्ञ बी आर सी यांनी केले. आज संपन्न झालेल्या या ऑनलाइन वेबिनार ला बार्शिटाकळी तालुक्यातील 100 विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.