अकोला: कोरोनाचा परिणाम केवळ आरोग्यावर झाला नसून, आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक संस्थेवरही विपरीत परिणा झाला आहे. अशातच लाॅकडाउनच्या काळात कुटुंब कलहाचा भडका उडाला असतानाच एका विवाहित स्त्रीने तिच्या फेसबुक मैत्रिणीसाठी चक्क आपला नवराच सोडला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशातच अकोला पोलिस विभागाच्या भरोसा सेलने त्या विवाहितेचे योग्य ते समुपदेशन करून तिला महिला वसतीगृहात आसरा मिळवून दिला आहे. माणुस हा समाजशील प्राणी आहे, हे आपण अनेकवेळा ऐकले असेल आणि वाचलेही असेल. मात्र, कोरोनाने अख्खा समाजच लाॅकडाउन करून टाकला आहे. तेव्हा याच समाजशील प्राण्याची घुसमट अनेक रुपाने बाहेर पडल्याचे दिसून आले. याच कोरोना लाॅकडाउन दरम्यान कुटुंबातील लहान-सहान कलहामुळे अनेकीनी महिला समुपदेशन कक्षाची पायरी चढली खरी. मात्र, याच दरम्यान एका महिलेची फेसबुक एका महिलेशी ओळख झाली. दोघी बोलायला लागल्या. बोलता-बोलता मैत्रित रुपांतर झाले आणि एकमेकींचे दुःख एकमेकींनी शेअर केले. मात्र, विवाहित असलेली शहरातील महिला त्या फेसबुक मैत्रिणीच्या ऐवढ्या प्रभावात गेली की, तिने दोन वर्षाची मुलगी आणि कमावता नवरा सोडण्याचा निर्णय घेऊन माहेर गाठले. माहेरच्या मंडळीनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही.
भरोसा सेलने दिली सुरक्षेची हमी
फेसबुक मैत्रिणीच्या प्रभावात आलेल्या त्या विवाहितेला माहेरच्या मंडळीनी ;अकोला पोलिस विभागाच्या भरोसा सेलमध्ये आणले. या कक्षाच्या प्रमुख एपीआय प्रणिता कराळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या महिलेचे योग्य ते समुपदेशन करून त्या महिलेला सुरक्षेची हमी देत शहरातील एका प्रतिष्ठीत वसतीतील महिला वसतीगृहात आसरा दिला आहे.