अकोला,दि.२७-जिल्ह्यात असलेले मोठे, मध्यम व लघू प्रकल्पाव्दारे पाण्याचा योग्य व पुरेपूर करण्याचे धोरण ठरवून उपलब्ध जलसाठ्याचे सुयोग्य नियोजन करुन शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन सुविधा उपलब्ध करुन द्या, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विविध विषयाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्याकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त संजय कापडनिस,निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अस्थित्वात असलेल्या प्रकल्पातून उपसा सिंचन पद्धत व गुरुत्वाकर्षण पद्धतीने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सिंचन व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी.यासाठी पाणी वापर संस्थाची नोंदणी करण्यात यावी. धरणातील गाळ मोठया प्रमाणात बाहेर काढून धरणाची सिंचन क्षमता वाढविण्यात यावी. याबाबतचा प्रस्ताव त्वरित शासनाकडे सादर करावे, अशा सूचना पालकमंत्री ना. कडू यांनी दिले.
निर्माणाधीन असलेले पुर्णा, उमा, काटेपुर्णा, घुंगसी बॅरेजची कामे विहित मुदतीत पूर्ण करावी. यासाठी येणाऱ्या अडचणीबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही पालकमंत्री ना. कडू यांनी दिले. राज्यस्तरावर प्रंलबित असलेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाची माहिती तयार करावी याबाबत लवकरच बैठक संबंधीत मंत्र्यासोबत घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पुनर्वसीत गावात मुलभूत सेवा त्वरीत प्रदान करण्यात याव्या. पुनर्वसित कायद्याप्रमाणे त्या गावातील प्रकल्पग्रस्तांना सोयीसुविधा व मोबदला देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
प्रायोगिक तत्वावर नदिच्या पात्रात डोह निर्माण करुन त्यावर भूमिगत बंधारे व रस्ता अशा प्रकारचे काम जिल्ह्यात एका ठिकाणी निर्माण करावे याबाबतचा प्रस्ताव त्वरित प्रशासनाकडे पाठविण्यात यावा, अशा सूचना जलसंपदा विभागाला दिल्या. जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पाबाबतची माहिती जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता सुनिल राठी यांनी दिली. यावेळी कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऑनलाईन सुविधेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश
येत्या सोमवार पासून प्रत्येक तालुक्यात सातत्याने एक आठवडा एका शाळेत इयत्ता पाचवीचा ऑनलाईन वर्ग घेवून त्याबाबतचे मुल्यांकन करुन त्यांचा फिडबॅक घेवून किती विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन सुविधेचा लाभ पोहोचत आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करा, असे निर्देश पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी दिले. यापूर्वी प्रायोगिक तत्वावर अमरावती विभागात पाचवीचा वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्याबाबत सूचना पालकमंत्री यांनी दिल्या होत्या त्याबाबतचा आढावा त्यांनी घेतला. शिक्षण ही मुलभूत गरज असल्याचे सांगून प्रत्येकापर्यंत ती पोहचणे आवश्यक आहे. यामध्ये येणाऱ्या अडचणी प्रायोगिक तत्वावर वर्ग घेतल्यानंतरच लक्षात येईल. यासाठी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधिताना निर्देश द्यावे, अशा सूचना त्यानी केल्या. यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रकाश मुंकूद व शिक्षणाधिकारी प्राथमिक वैशाली ठग यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शाळेची गुणवत्ता, पटसंख्या, लोकवर्गणी व पालकांचा पालकसभेला असलेला सहभाग यावर आधारित आदर्श शाळा तयार करण्यासाठी प्रस्ताव त्वरीत जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री ना. कडू यांनी दिले.