अकोला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. यातून राजकीय क्षेत्रही सुुटू शकलेले नाही. विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचा सहा वर्षांचा कार्यकाळ १९ जुलै रोजी संपला आहे. कोरोनामुळे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सर्व शिक्षक संघटनांनी निवडणुकीची तयारी केली; परंतु या तयारीवर कोरोनाने पाणी फेरले आहे. शिक्षक मतदारसंघासाठी आतापर्यंत ३५ हजारावर शिक्षकांनी मतदार नोंदणी केली आहे.
विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची जुलै महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता होती; परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, निवडणूक आयोगाने अधिसूचना काढली नाही. त्यामुळे निवडणूक लांबण्याची शक्यता आहे. निवडणूक लांबली असली, तरी कधीही निवडणुकीची अधिसूचना निघू शकते. या अपेक्षेने इच्छुक उमेदवार मतदार संपर्कावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना महामारीपूर्वी निवडणूक विभागाने मतदार याद्या तयार करण्याचे काम विभागीय स्तरावरून सुरू केले होते. तसेच इच्छुक उमेदवारांनीसुद्धा मतदार नोंदणी सुरू केली होती. बऱ्यापैकी नोंदणीचे कामही आटोपले होते. त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी मतदारांसाठी जेवणावळींसह शिक्षकांचे मेळावेसुद्धा घेतले होते; परंतु अचानक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला. शाळा, महाविद्यालयांना २२ मार्चपासून सुटी देण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसल्यामुळे निवडणुकीविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नियोजित वेळी होण्याची शक्यता धूसर झाली आहे. अद्यापर्यंतही निवडणूक आयोगाकडूनही निवडणुकीबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही; परंतु निवडणूक कधीही होईल, या आशेवर इच्छुक उमेदवारांनी शिक्षकांसोबत संपर्क कायम ठेवला आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
या संघटना निवडणुकीच्या तयारीत!
४विधान परिषद अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी शिक्षक संघटना सज्ज आहेत. जुलै महिन्यात निवडणूक होईल. या अपेक्षेने शिक्षक संघटनांनी उमेदवारसुद्धा रिंगणात उतरविले आहेत.
४निवडणुकीसाठी राज्य शिक्षक परिषद, शिक्षक आघाडी, शिक्षक महासंघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना, विदर्भ ज्युनिअर टिचर्स असोसिएशन (विजुक्टा), भाजप शिक्षक सेल, विभागीय शिक्षक संघ, शिक्षक सेना आदींनी शिक्षक मतदारांची नोंदणी केली आहे. या सर्व शिक्षक संघटनांनी उमेदवारांच्या नावांची घोषणासुद्धा केली आहे.