बुलडाणा : पोलिस कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कोरोनासंसर्ग झाल्यामुळे अख्खे पोलिस ठाणेच सील करून काही दिवसांसाठी बंद ठेवावे लागले आहे. पिंपळगावराजा (ता.खामगाव) पोलिस ठाण्याची ही घटना आहे. आता या पोलिस ठाण्याचा कार्यभार खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.
मागील आठवड्यात पिंपळगावराजा पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरिक्षकासह ६ पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली होती. या बाधितांच्या संपर्कातील २६ जणांचे स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते, यापैकी ४ पोलिस कर्मचाऱ्यांचा अहवाल गुरूवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. अखेर खबरदारी म्हणून पिंपळगावराजा पोलिस ठाणे पुर्णपणे सील करून कन्टोनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.