हिवरखेड (प्रतिनिधी)- अकोला पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांच्या नेतृत्वातील पथकाने हिवरखेड ठाणेदारांच्या नाकावर टिच्चून हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत खुलेआम सुरू असणाऱ्या मोठ्या हाय प्रोफाईल जुगारावर जंगी धाड टाकून 35 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीमध्ये हिवरखेडच्या माजी सरपंचासह अनेक मोठ्या हस्तीचा समावेश आहे. विशेष पथकाने एकाच आठवड्यात तीन यशस्वी कारवाया केल्यामुळे हिवरखेड ठाणेदारांवर नामुष्कीची वेळ आल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर असे की हिवरखेड रेल्वे स्टेशन जवळ चंदनपूर शेतशिवारात डांबरीरोड लगतच्या युसुफ खा मुजफ्फर खा यांच्या शेतातील घरात (फार्म हाऊस) मध्ये पत्यांचा मोठा गेम सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. 12 जुन रोजी रात्री पथकाने या ठिकाणी धाड टाकली. यावेळी एकूण 18 आरोपींना रंगेहाथ पकडले तर 1 आरोपी संदीप खारोडे, नाथ नगर, तेल्हारा हा पळून जाण्यात यशस्वी झाला. पकडलेल्या व्यक्तींमध्ये युसूफ खा मुजफ्फर खा, शेख सादिक उर्फ अब्दुल सादिक शेख सलाम, रा. हिवरखेड, अजय शंकरराव गावंडे, अनुराग प्रकाश अग्रवाल, शेख रशीद शेख युसूफ, हरीश सुरेशसिंग मलिये, निसार शाह हुसेन शाह, सर्व रा. तेल्हारा, गोपाल प्रल्हाद इंगळे माळेगाव बाजार, सैय्यद फारुख सैय्यद मुजफ्फर, कैलाश महादेव धुळे रा. अकोट, भास्कर नामदेव मानकर बोर्डी, संतोष रामगिर गिरी, सिद्धार्थ फकिरा वानखडे, राजेश बळीराम चोपडे, सतीश गोपाल झगडे, सर्व रा. बानोदा एकलारा, नासिर खान बशीर खान शिवपुरा जळगाव जामोद, अनवर अली हशमत अली, शाकीर शहा इब्राहीम शहा अंजनगाव सुर्जी या 18 आरोपींचा समावेश आहे.
उपरोक्त आरोपींकडून रोख नगदी दोन लाख ऐंशी हजार, सतरा मोबाईल किंमत सव्वा लाख, पाच मोटार सायकल- किंमत सव्वा तीन लक्ष रुपये, तीन नग चार चाकी गाड्या (कार) किंमत 28 लक्ष रुपये, आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 35,30,870 पस्तीस लाख तीस हजार रुपयांच्या वर मुद्देमाल जप्त केला आहे. उपरोक्त कारवाई अकोला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद बहाकर यांच्या नेतृत्वातील विशेष पथकाने केली. एकूण 19 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
35 लाखाचा मुद्देमाल जप्त झालेला हाय प्रोफाईल जुगार अड्डा चक्क वर्दळीच्या डांबरी रस्त्यावरील फार्म हाऊस वर खुल्लेआम चालतो तीन जिल्ह्यातील जुगारी नियमित गोळा होतात आणि अकोल्याचे पथक कार्यवाही करू शकते तर हिवरखेड ठाणेदारांना ही बाब माहीत नव्हती की त्यांच्यात कार्यवाहीची हिम्मत नव्हती की “राजमलाई” चा आस्वाद घेऊन ते “अर्थपूर्ण” झोपीत होते ? असे विविध प्रश्न जनतेत चर्चिल्या जात आहेत. एकाच आठवडयात विशेष पथकाने या परिसरात लागोपाठ तीन यशस्वी कार्यवाह्या केल्यामुळे हिवरखेड पोलिसांची सर्वत्र नामुष्की होत असून पोलीस अधीक्षकांनी दबंग ठाणेदार द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.