मेक्सिकोतील एका व्यसनमुक्ती केंद्रावर झालेल्या गोळीबारात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला मेक्सिकोतील इरापुआटो शहरातील केंद्रावर झाला. यात सातजण जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी व्यसनमुक्ती केंद्रावर अंधाधुंद गोळीबार केला. मात्र, कोणाचेही अपहरण केलेले नाही. अद्याप हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. या हल्ल्याचे कारण देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. इरापुआटो येथील व्यसनमुक्ती केंद्रावर झालेला महिनाभरातील हा दुसरा हल्ला आहे. याआधी ६ जून झालेल्या हल्ल्यात १० जण ठार झाले होते.
तर गर्व्हनर डिईगो रॉड्रिग्ज वालेजो यांनी ड्रग्ज विक्री करणारा गँग यामागे असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या हल्ल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
मेक्सिकोतील बहुतांश व्यसनमुक्ती केंद्रे खासगी स्वरुपात चालवली जातात. व्यसनमुक्तीसाठी मेक्सिको सरकारकडून खूप कमी पैसा खर्च केला जातो.