अकोला–कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लवकरात लवकर चाचणी होणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी बाळापूर शहरात कोरोना चाचणीसाठी घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याची सुविधा करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग होण्याच्या दृष्टीने जोखमीचे असलेले वयस्क व अन्य व्याधींनी ग्रस्त असलेल्या लोकांनी स्वतःहून चाचणीसाठी पुढे यावे व आपले घशातील स्त्रावाचे नमुने द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
बाळापुर शहरात सातत्याने करोना विषाणूने प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर आतापर्यंत नऊ लोकांचे मृत्यू सुद्धा झालेले आहेत. बाळापुर शहरातील छोटा मोमीनपुरा, बडा मोमीन पुरा,सय्यद पुरा ,वजीराबाद, कागजीपुरा, जवळी वेस या भागात जास्त करोना पेशंटची संख्या आढळून आली आहे. बाळापुर शहरातील जोखमीचे व अन्य आजार असलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये वयस्कर व इतर आजार असलेल्या लोकांना लगेच होतो, हे लक्षात घेऊन , बाळापुर शहरातील व्यक्तींची चाचणी करण्यासाठी त्यांचे swab घेण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार मागील आठवड्यात बाळापूर शहरातील खतीब हॉल येथे swab घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी आतापर्यंत केवळ २५ नागरिकांनी त्यांचे swab दिले आहेत. विशेष म्हणजे त्यातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशाप्रकारे नागरिकांमध्ये करोना चाचणी करून घेण्याच्या दृष्टीने त्यांचे swab दिल्यास रुग्णांचा शोध घेऊन, त्यांच्यावर उपचार करणे व संभाव्य संसर्ग रोखणे शक्य होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपली करोना विषाणूची चाचणी करून घेण्यासाठी swab घेण्याच्या ठिकाणी आपले swab द्यावेत , जेणेकरून त्यांच्यावर त्वरित उपचार करणे शक्य होऊन त्यांच्या परिवारालाही वेळेत सुरक्षित ठेवता येईल,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.