अकोला,दि.२८- कोरोनाचा संसर्गाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी शक्य तितक्या लवकर रुग्ण ओळखला जाणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विविध भागात आरोग्य सर्वेक्षणाअंती जोखमीचे व्यक्ती व अन्य व्याधीग्रस्त, ज्येष्ठ नागरिक म्हणून नोंद केलेल्या व्यक्तिंच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात संकलन केलेल्या १३९८ नमुन्यांतून गेल्या १३ दिवसांत १४७ जण पॉझिटीव्ह आढळले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
कोरोना संसर्गाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी अकोला शहरात पॉझिटीव्ह रुग्ण ज्या भागात जास्त आढळले त्या भागातच स्वॅब संकलन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यासाठी शहरातील अकोट फैल, जेतवन नगर, तारफैल, हरिहर पेठ याठिकाणी स्वॅब संकलन केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रांवर त्या त्या भागातील ज्येष्ठ नागरिक, अन्य व्याधीग्रस्त इ. जोखमीचे व्यक्तींची चाचणी करुन घेण्यासाठी घशातील स्त्रावांचे संकलन करण्यात आले.
त्यात अकोट फैल येथील केंद्रावर ४८ जण, जेतवन नगर येथील सहा, तारफैल येथील २३, हरिहरपेठ येथील केंद्रावर ७० असे एकूण १४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे या लोकांचे लवकर निदान होऊन वेळीच उपचार सुरु करता आले. त्यामुळे तेथील संभाव्य फैलावास आळा घालणे काहीप्रमाणात शक्य झाले. चाचण्या झाल्याच नसत्या तर हे लोक अजुनही रुग्ण म्हणून ओळखणे शक्य नव्हते,असेही निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी स्पष्ट केले आहे.