अकोला,दि.२४ : मुर्तिजापूर येथील वसाहतींमधील रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरीत पुर्ण करा. या कामाच्या दिरंगाईस जबाबदार व्यक्तिंवर कारवाई करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले.
मुर्तिजापूर येथे आज मुर्तिजापूर शहरातील वसाहती मधील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवणूकीसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तहसीलदार प्रदीप पवार, मुख्याधिकारी विजय लोहकरे, संत गाडगे महाराज संस्था अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, नगरसेवक तसलीम खान, देविदास घोडे, कैलास महाजन, अंकित अग्रवाल , संतोष इंगोले, नगरपरिषद अभियंता पुरुषोत्तम पोटे व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. संत गाडगे महाराज गौरक्षण संस्थान येथे ही बैठक पार पडली.
मुर्तिजापूर नगरपरिषद भागात राहणाऱ्या रहिवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी दिलेल्या निवेदनावरुन या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुर्तिजापूर येथील पाइप लाइन चा प्रश्न, वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच पाण्याची टाकी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना आतापर्यंत तीन किलोमीटर पाणीपुरवठा योजना का पूर्ण झाली नाही? यासंदर्भात विचारणा केली. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, या कामात दिरंगाई करत असल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला तीन हजार रुपये प्रति दिवस प्रमाणे दंड लागू आहे. तथापि संबंधित ठेकेदारावर त्वरित कारवाई करून ही योजना पूर्ण करा,असे निर्देश ना. कडू यांनी दिले. नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने मुर्तिजापूर येथील पाइपलाइनची समस्या निकाली काढावी, अशा सुचना ना. कडू यांनी केल्या.
बैठकीच्या आधी ना. कडू यांनी येथील संत गाडगे महाराज संस्थान च्या गोरक्षण संस्थान येथे भेट देऊन संत गाडगे महाराजांना अभिवादन केले व संस्थानच्या कार्याची पाहणी करुन माहिती घेतली.